शिवसेनेतील ‘संभाजी’ राष्ट्रवादीच्या गडावर?

डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार?

दूरचित्रवाणीवरील छत्रपती संभाजी राजे मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित डॉ. कोल्हे यांचा उद्या (शुक्रवारी) पक्षप्रवेश होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणूनही डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव चर्चेत पुढे आले आहे. कोल्हे यांच्याबरोबर दोन माजी आमदारांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित मुंबईत डॉ. कोल्हे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे समजते.

डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे बडे नेते व स्टार प्रचारक असल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांआधी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. कोल्हे हेही होते. दोघांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते, मात्र सदिच्छा भेट असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. परंतु, आता डॉ. कोल्हे राष्ट्रवादीत दाखल होण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.