Actor selling Coriander : ‘या’ कोथिंबीर विक्रेत्याला ओळखलं का?

Actor selling Coriander: Do you know this cilantro seller? लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने मराठी अभिनेत्याने नाचत नाचत विकली कोथिंबीर

एमपीसी न्यूज – तब्बल तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता जनजीवन थोडेफार स्थिरस्थावर होऊ लागले आहे. कोरोनाची भीती प्रत्येकालाच आहे. पण आता त्याला सोबत घेऊनच जगायचे आहे हे सिद्ध झाले आहे. या लॉकडाऊनच्या काळात नोकरीची शाश्वती नसल्याने अनेकांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी पिंपरीतील कोथिंबीर विक्रेत्याचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो नेमका आहे तरी कोण अशी चर्चा होत होती. आता तो कोण आहे हे समोर आले आहे.

‘कोथिंबीर घ्या.. कोथिंबीर घ्या.. 14 रुपये.. 14 रुपये..’ अशी आरोळी देऊन कोथिंबीर विकणारा हा तरुण एक मराठी अभिनेता असून त्याचं नाव रोशन शिंगे असं आहे. रोशनने आपल्या इन्स्टाग्रामवर कोथिंबीर विकतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. अभिनेता असल्याने आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी नाचत आणि गात तो आपल्याच अंदाजात कोथिंबीर विकत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रोशन शिंगे म्हणाला की, ‘माझं कौशल्य लॉकडाउनमुळे वाया जाऊ नये असं वाटते. मला सध्या पैशांची गरज असल्यामुळे जे हाताला मिळेल ते काम मी करत आहे. अभिनय कौशल्याचा वापर मी भाजी विकण्यासाठी केला. बाजारातील वाढती गर्दी पाहून मी घरोघरी जाऊन भाजी विकण्याचा निर्णय घेतला आहे.’

रोशन शिंगे Raghu 350 या चित्रपटात काम करत आहे. 19 मार्चपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं. पण, काही कारणास्तव ते 22 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च पासून देशात लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग रद्द करावे लागलं. गेल्या तीन महिन्यापासून काही काम नसल्यामुळे रोशनने अखेरीस भाजी विकण्याचा निर्णय घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like