BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रोजगार ऐवजी डान्सबार, छावणी ऐवजी लावणी; देणा-या सरकारचा तीव्र निषेध – वैशाली काळभोर

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पत्रकाद्वारे तीव्र निषेध

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, मागेल तेथे टँकरने पाणी पुरवठा करु, ग्रामीण भागात मागेल त्या गावात जनावरांसाठी चारा छावणी उभारु, असे पोकळ आश्वासन देणा-या सरकारने रोजगारा ऐवजी डान्सबार सुरु केले. छावणी ऐवजी लावणी सुरु केली अशा निष्क्रिय सरकारचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस तीव्र निषेध करीत असल्याचे पत्रक राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गिय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिलांचा सन्मान करीत तसेच भावी पिढीला व्यसनांपासून रोखण्यासाठी महाराष्ट्रात डान्सबार बंद केले. त्याविरुध्द डान्सबार चालक, मालकांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा तत्कालीन सरकारच्या वतीने आर. आर. पाटील यांनी उच्च न्यायालयात सक्षमपणे प्रतिवाद केला होता. म्हणून उच्च न्यायालयाने देखील डान्सबारवरील बंदी कायम ठेवली. त्यानंतर डान्सबार चालक, मालकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर विराजमान असणा-या देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणूकांसाठी आर्थिक निधी गैरमार्गाने गोळा करण्याच्या उद्देशाने डान्सबार बाबत सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात डान्सबार पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली. हा महिलांचे शोषण करणारा, शेतक-यांचा सातबारा कोरा करणारा आणि तरुणांना व्यसनाच्या खाईत लोटणारा निर्णय आहे.

या विषयांबाबत फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे प्रतिवाद करीत नाहीत तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याविषयी अध्यादेश काढू, असे दिशाभूल करणारे वक्तव्य शहरात येऊन करतात. हा महिला भगिनींचा आणि बेरोजगारांचा अपमान आहे. कोणतेही निश्चित धोरण नसताना अचानकपणे, हुकूमशाही पध्दतीने देशातील जनतेला, संसदेला, भारतीय रिसर्व्ह बँकेला अंधारात ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सव्वाशे कोटी जनतेवर नोटा बंदी लादली. त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योजकांपासून ग्रामिण भागातील छोट्या शेतक-यांपर्यंत सर्वजण आर्थिक संकटात सापडले आहेत. बेरोजगार युवकांना नोकरी देऊन किंवा व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याऐवजी, दुष्काळीभागातील शेतक-यांना जनावरांसाठी चारा छावणी उभारण्यास मदत करण्याऐवजी डान्सबार सुरु करण्या-या सरकारचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला तीव्र निषेध करीत आहे, असेही वैशाली काळभोर यांनी पत्रकात म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.