Pune : धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुढे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्रा तरुण मंडळाने चौथे तर कर्वेनगर येथील स्वस्तिश्री गृहरचना संस्था मर्यादित यांनी पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या 187 मंडळांपैकी 86 मंडळांना पारितोषिके मिळाली असून ट्रस्टच्या वतीने 11 लाख 39 हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश कला क्रिडा मंच स्वारगेट येथे होणार आहे. कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत आदर्श मित्र मंडळाच्या जलसंवर्धन काळाची गरज आणि शेतकरी कर्जमाफी या देखाव्याला 51 हजार रुपयांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या सर्जिकल स्ट्राइक या देखाव्यात 45 हजारांचे, काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या काल्पनिक गणेश मंदिराला 40 हजारांचे, महाराष्ट्र तरुण मंडळाच्या सैनिक हो तुमच्यासाठी या देखाव्याला 35 हजारांचे आणि स्वस्तिश्री गृहरचना संस्थेच्या पंचतत्त्वांच्या पर्यावरण पूरक समतोल या देखाव्याला 30 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, ट्रस्टचे यंदा 126 वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत या सर्व उपक्रमांत सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती www.dagadushethganpati.com या संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच भाविकांनी सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, विजय चव्हाण, अनिल घाणेकर, राजन काळसेकर, मधुकर जीनगरे, सुरेश वरगंटीवार,मोहन शेटे यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.