Pimpri : जन्म-मृत्यू नोंदीच्या कामात हलगर्जीपणा करणा-या संस्थेस काळ्या यादीत टाका – संदीप वाघेरे 

एमपीसी न्यूज – जन्म-मृत्यू नोंदीचे दाखले देणा-या संस्थेला कोणताही अनुभव नाही. त्यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच या संस्थेकडून नियमाचे उल्लंघन होत आहे. तरी देखील वैद्यकीय विभागाची या  संस्थेवर एवढी कृपादृष्टी का दाखविली जात आहे? असा सवाल भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या संस्थेला काळ्यात यादीत टाकून नवीन अनुभवी संस्थेला काम देण्याची मागणीही त्यांनी केली. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभाग अंतर्गत मनपा हद्दीतील नागरिकांचे जन्म मृत्यू नोंद ठेवून दाखले वितरीत केले जातात. हे काम दिलेल्या संस्थेस अनुभव नसल्यामुळे नागरिकांचे दाखले मिळणेकामी अतोनात हाल होत आहेत.

तसेच जन्म मृत्यू नोंदी ठेवणे ही एक महत्वपूर्ण बाब आहे. या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अपेक्षित नाही. हे कामकाज शासनाच्या ‘सर्व्हिस टू ऑदर’ या कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दंडात्मक कारवाई होऊ शकते. या कामामध्ये करारनाम्यातील अटीचे वारंवार उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. तरी देखील वैद्यकीय विभागामार्फत संस्थेवर एवढी कृपादृष्टी का केली जात आहे. नागरिकांची गैरसोय करण्यामध्ये वैद्यकीय अधिका-यांना कोणता आनंद मिळत आहे? असा सवाल वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.

हे काम असेच पुढे सुरु राहिल्यास महापालिकेस नागरिकांच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल. त्यामुळे कामामध्ये अनुभव नसतानाही हलगर्जीपणे काम करणा-या संस्थेचे काम रद्द करून काळ्या यादीमध्ये नाव टाकावे आणि  नवीन अनुभवी संस्थेस काम देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.