Pune : अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा – अजित पवार

एमपीसी न्यूज – लालबागचा राजा या गणपतीचे दर्शन घेताना पोलीस अधिकारी आणि नागरिकांना धक्काबुकी झाल्याची घटना घडली आहे. असे प्रकार होता कामा नये. या सर्व घटना लक्षात घेता अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. तसेच संभाजी भिडे गुरुजी असो वा कुणी मौलवी अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये. अशांवर कारवाई झाली पाहिजे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा येथे दर्शनासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवर त्यांनी भूमिका मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्यात 65 हजार कोटी खर्च होऊन देखील सिंचन प्रकल्पाची टक्केवारी वाढली नसून आमचे सरकार असताना हजारो कोटी कसे खर्च झाले, अशी विचारणा सध्याच्या सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली होती. आता त्यांनी सिंचन प्रकल्पाची माहिती द्यावी, अशी मागणी करीत सरकारवर सडकून टीका केली.

ते पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार हे पोकळ आकडेवारी, नोटबंदी, इंधन दरवाढ आणि महागाई यामुळे जनता कंटाळली आहे. ही जनता आगामी निवडणुकीत या सरकारला त्यांची जागा दाखवेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.