डॉ आंबेडकरांवरील ‘स्टार प्रवाह ‘ मालिकेत आदित्य बीडकर

एमपीसी न्यूज- पुण्याचा युवा कलाकार आदित्य बीडकर हा ‘स्टार प्रवाह ‘ मराठी वाहिनीवर ‘ डॉ.बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा’ या महामालिकेत डॉ.आंबेडकर यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या भूमिकेत बालपणीच्या सर्व प्रसंगात दिसणार आहे.

नितीन वैद्य यांच्या ‘दशमी क्रिएशन ‘ ची ही मालिका 18 मे 2019 ( बुद्धजयंती )पासून छोट्या पडद्यावर दिसणार आहे. अजय मयेकर हे मालिकेचे दिग्दर्शक आहेत. आंबेडकरांच्या ज्येष्ठ बंधूंची , बालपणीची भूमिका आदित्यने साकारली आहे. ते घरचा संघर्ष पाहून आक्रमक पणे परिस्थितीशी सामना करणारे, पण कला आवडणारे व्यक्तिमत्व होते. लहान वयातील डॉ.आंबेडकर यांना संघर्षाची दीक्षाच ते देतात. आंबेडकरांच्या बालपणातील महू, आंबवडे येथील प्रसंगात आदित्य आहे. हे चित्रीकरण भोर, मुंबई येथे झाले.

लहानपणापासून पुण्यातील प्रकाश पारखी यांचे नाट्यसंस्कार शिबिर, अनेक वक्तृत्व स्पर्धा, अभिनय, शॉर्ट फिल्म, जाहिराती, ग्रिप्स थिएटर, स. प. कलामंडळ, मौनांतर स्पर्धा, फिरोदिया, पुरुषोत्तम करंडक गाजवून आदित्य इथपर्यंत अत्यंत मेहनतीने, संघर्ष करीत स्वबळावर पोहोचला. निर्मिती सावंत यांच्यासमवेत ‘ निर्मल ग्राम ‘ अभियानावरील माहितीपटात फारपूर्वी त्याने अभिनय केला केला होता. ‘इंडियन मॅजिक आय’ बरोबर जाहिरातीत त्याने काम केले आहे. समवयीन मित्र – मैत्रिणींसाठी त्याने स्वतःच अभिनय प्रशिक्षण शिबिर पण घेतले आहे. प्रसिध्द युवा कलाकार अथर्व कर्वे, ऐश्वर्या तुपे यांच्याबरोबर ‘ स्वातंत्र्यवीरायण ‘ या व्यावसायिक नाटकातही त्याने भूमिका केली आहे.

स. प. महाविद्यालय ( पुणे ) येथे कला शाखेच्या पहिल्या वर्षाची आदित्यची वार्षिक परीक्षा सुरु असतानाच ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचे शूटींग भोरमध्ये सुरु झाले ! या दोन्ही परीक्षाची कसरत त्याने सांभाळली. ‘लाठी’ या संजय सूरकर दिग्दर्शित, त्यांच्या अखेरच्या मराठी सिनेमात आदित्य मोठ्या पडद्यावर झळकला. मग अनेक वर्ष रंगभूमीवर वावरत राहिला. ‘भूमिका ‘ या व्यावसायिक नाटकाच्या अनेक प्रयोगात तो होता. आता १८ मे २०१९ पासून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

आदित्यला लेखन, वक्तृत्व, अभिनयाचा, कलेचा वारसा घरातून लाभला. बीडकर घराण्यात नाट्यसंगीत ऐकण्याची गोडी होती.आदित्यच्या आई गौरी भावे -बीडकर या आकाशवाणी वर, केबल वाहिन्यांवर निवेदिका होत्या, त्यांनी स्त्री -सक्षमीकरणावर आधारित ‘ सोंगटी ‘ दीर्घांकाची निर्मिती करून दिल्लीपासून महाराष्ट्रात प्रयोग केले.आदित्यचे वडील दीपक बीडकर हे पत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रात १९९६ पासून कार्यरत आहेत.

‘भारतीय इतिहासातील मोठया चरित्र नायकाच्या भावाची भूमिका करणे, हा आजवरच्या अभिनय प्रवासात जुळून आलेला सर्वात मोठा योग होता. मिलिंद अधिकारी, चिन्मयी सुमित या कलाकारांसमवेत काम करता आले. डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेतील सागर देशमुख यांचा अभिनय शूटींग दरम्यान पाहता आला, काही परदेशीं कलाकारांच्या भेटी झाल्या, त्यांच्याकडून अभिनयाच्या टीप्स मिळाल्या आणि टी.व्ही. वर आपण दिसणार आहोत, हेच मोठे समाधान आहे ‘ असे आदित्य बीडकर सांगतो ! ‘ दशमी ‘ च्या निर्मिती व्यवस्थेत अत्यंत खेळीमेळीचे वातावरण होते, कसलाही त्रास झाला नाही, असा त्याचा अनुभव आहे.

१८ मे २०१९ पासून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावर, ‘ स्टार प्रवाह ‘ वाहिनीवर ‘ डॉ.आंबेडकर ‘ मालिकेत सुरुवातीच्या अनेक भागात , रात्री ९ वाजता आदित्य बीडकरचा अभिनय पाहता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.