Aditya Birla Hospital: बिर्ला हॉस्पिटलने खास कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलमध्येच उभारले ‘सलून’ आणि ‘स्पा’

Aditya Birla Hospital sets up 'saloon' and 'spa' in hospital for staff सलून व स्पा मध्ये सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाते. मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर यांचा वापर केला जातो. दिवसभरात 20 ते 25 कर्मचाऱ्यांनाच सुविधा दिली जाते.

एमपीसी न्यूज- आदित्य बिर्ला हॉस्पिटलने अभिनव उपक्रम राबवत खास कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलमधेच ‘सलून’ व स्पा सुविधा सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे बिर्ला हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.

लॉकडाउनमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी देशातील सार्वजणिक ठिकाणांसहित सलून व स्पा बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले.

पाच टप्प्यात लागू करण्यात आलेल्या या लॉकडाउनमध्ये काही गोष्टींना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. मात्र, सलून, स्पा आज देखील बंदच आहेत. त्यामुळे वाढलेली दाढी आणि डोक्यावरील केस यामुळे नागरिक हैराण आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील या समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे या उद्देशाने आदित्य बिर्ला हॉस्पिटलने हॉस्पिटलमधील सर्व पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलमध्येच सलून व स्पाची व्यवस्था केली आहे.

बिर्ला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचारी यांच्यासहित सुमारे 800 कर्मचारी काम करतात. सलग तीन महिन्यांपासून सलून व स्पा दुकाने बंद असल्यामुळे हे कर्मचारी हैराण होते.

तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळेवर केस, दाढी कमी करणे गरजेचे आहे म्हणून हॉस्पिटलमध्येच सलून व स्पा सुरु करण्यात आले. हे सुविधा सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु असते. यामध्ये केस कापणे, दाढी करणे, पेडिक्यूयर, म्यॅनीकूयर यासारख्या सुविधा दिल्या जातात.

सलून व स्पा मध्ये सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाते. मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर यांचा वापर केला जातो. दिवसभरात 20 ते 25 कर्मचाऱ्यांनाच सुविधा दिली जाते.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. खासकरून जेंव्हा कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असताना.

लॉकडाउन शिथिल केला असलातरी संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना सलून आणि स्पा संबंधित सुविधा हॉस्पिटलमध्येच उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.