Advisory for Domestic flight Passengers: विमानाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस घरीच राहणे बंधनकारक

Advisory for Domestic flight Passengers; Passengers arriving in the state by air are required to stay at home for 14 days देशांतर्गत विमान सेवेतील प्रवाशांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शिका जारी

एमपीसी न्यूज – देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात आजपासून सुरु करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका आज निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि या प्रवाशांनी 14 दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक असून या कालावधीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे.

प्रवाशांना सुरक्षित अंतराचे नियम पाळत त्यांच्या वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. तथापी, हा प्रवास विमानतळ ते कंटेनमेंट झोन किंवा कंटेनमेंट झोन ते विमानतळ असा करता येणार नाही, ही बाब या मार्गदर्शिकेत स्पष्ट करण्यात आली आहे.

राज्यात या मार्गदर्शिकेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी विमानतळ असलेल्या संबंधित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमित करण्यात आले.
प्रवाशांची नावे, त्यांच्या आगमनाचा दिवस आणि वेळ, मोबाईल क्रमांक, पत्ते इत्यादी सविस्तर माहिती संबंधित एअरलाईन्स आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधीत नोडल अधिकाऱ्यास उपलब्ध करुन द्यावयाची आहे. आदी विविध सूचना मार्गदर्शिकेद्वारे देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाने यासंदर्भात काल मार्गदर्शिका प्रसारित केली. ही मार्गदर्शिका हवाई मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल. जे प्रवासी राज्यात कमी कालावधीसाठी येणार आहेत (एक आठवड्यापेक्षा कमी) आणि त्यांचे पुढील प्रवासाचे किंवा परतीचे नियोजन आहे, त्यांनी याची संपूर्ण माहिती दिल्यास त्यांना गृह विलगीकरणातून सवलत देण्यात येईल. तथापि, या प्रवाशांना कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी नसेल. प्रवाशांनी प्रवासादरम्यान काय करावे आणि काय करु नये यासंदर्भातील माहिती सेवा पुरवठा एजन्सींनी प्रवाशांना तिकीटासोबत देणे बंधनकारक आहे.

सर्व प्रवाशांनी आरोग्यसेतू मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी या ॲपवरील संबंधित घोषणापत्र भरावे. कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात विमानात तसेच विमानतळांवर उद्घोषणा करण्यात याव्यात. तसेच प्रवाशांकडून विमानतळावर तसेच विमानत चढ-उतार करताना सुरक्षित अंतराचे पालन करण्यात यावे.

प्रवाशांनी राज्यातील विमानतळावर उतरल्यानंतर स्वयंघोषणापत्र भरुन सादर करावयाचे आहे. विमानतळावर तपासणीसाठी पुरेसे वैद्यकीय पथक कार्यरत असेल याची काळजी नोडल अधिकारी यांनी घ्यायची आहे. विमानतळाचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असून साबण, सॅनिटायजर यांची उपलब्धता करण्यात यावी. प्रवास सुरु होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची थर्मल तपासणी होईल याची काळजी विमानतळ प्राधिकरणाने घ्यायची आहे. लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश देण्यात येईल.

सर्व प्रवासी, एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करावा. आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांना नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात येईल आणि केंद्र शासनाच्या यासंदर्भातील मार्गदर्शिकेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.