Advocate Umesh More Murder : उमेश मोरे खून प्रकरणातील खरा सूत्रधार वेगळाच, पोलिसांना संशय; आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसीन्यूज : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणारे ॲड. उमेश मोरे ऑक्‍टोबरपासून बेपत्ता होते. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून उमेश मोरे यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटकही केली आहे. परंतु, या खून प्रकरणातील खरा सूत्रधार दुसराच कोणीतरी असल्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळे आरोपींची चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी कपिल विलास फलके (वय 34), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32) या तीन आरोपींना अटक केली आहे.

आरोपींनी 1 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून उमेश मोरे यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी मृतदेह ताम्हिणी घाटात घेऊन गेले. आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला.

दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांनी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना संशयास्पद अवस्थेत तीन व्यक्ती दिसून आले.

त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला आरोपी कपिल फलके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्याने इतर दोन आरोपींसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी इतर दोन्ही आरोपींना अटक केली.

पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयासमोर या खून प्रकरणातील खरा सूत्रधार वेगळाच असल्याची शक्यता वर्तवली. दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून आरोपींनी उमेश मोरे यांचा खून केला असून त्याच्या अटकेसाठी न्यायालयासमोर पोलीस कोठडीची मागणी केली.

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन, शस्त्र, कपडे जप्त करण्यासाठी तसेच हा खून करण्यामागे नेमका उद्देश काय आहे याचा तपास करण्यासाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.