T20 World Cup 2021 : अफगाणिस्तान संघाने केली स्कॉटिश संघावर दणदणीत मात 

मुजीबुर रहेमान, रशीद ने मिळवल्या 9 विकेट्स

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : कधीही कोणालाही पराभूत करण्याची क्षमता ज्या संघात आहे तो संघ म्हणजे अफगाणिस्तान. आज याच संघाने तुलनेने दुबळ्या स्कॉटलंड संघावर 130 धावांनी मात करत मोठा विजय मिळवून या स्पर्धेत आपले आव्हान कसे कठीण असेल याचीच जणू प्रचिती दिली.

चांगली फलंदाजी, उत्तम क्षेत्ररक्षण आणि खतरनाक स्पिन गोलंदाजीचा त्रिवेणीसंगम या अफगाणिस्तान संघात आहे असे म्हटले जाते, त्यामुळेच बघताबघता या संघाने आपला दबदबा जागतिक क्रिकेट विश्वात निर्माण केलाय असे म्हटले तर त्यात फार काही गैर असणार नाही.

शारजा येथील मैदानावर झालेल्या आजच्या ग्रुप बी च्या आणि वर्ल्डकपच्या 17 व्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद शहजादने स्कॉटलंड विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने जझाईच्या साथीने डावाची सुरुवात करताना अर्धशतकी सलामी नोंदवून तो सार्थ ही ठरवला. शहजाद 15 चेंडूत 22 धावा करून संघाची धावसंख्या 54 असताना बाद झाला. पण या चांगल्या सलामीचा फायदा झझाई आणि पुढच्या फलंदाजाने चांगलाच उठवत मोठमोठ्या भागीदाऱ्या जमवून संघाला सुस्थितीत आणून ठेवले. झझाई 44, गुरबाज 46 आणि नजीबुल्लाहच्या वेगवान 59 धावांमुळे अफगाणिस्तान संघाने आपल्या निर्धारित 20 षटकात तब्बल 190 धावा कुटल्या ,ज्यामध्ये 11 गगनचुंबी षटकार आणि 13 चौकार सामील होते.

या विशाल लक्षाचा पाठलाग करतान स्कॉटलंड संघाची दाणादाण उडाली. मूजीबुर रहेमानने एकाच षटकात तीन गडी बाद करत त्यांचे मुळातच कठिण असलेले लक्ष आणखीनच कठीण केले.दुसऱ्या बाजूने नवीनउलहकनेही एक बळी मिळवत त्यांची अवस्था चार गडी बाद 30 केली ,यातुन स्कॉटिश संघ सावरण्याआधीच मूजीबने आपला चौथा बळी मिळवून त्यांना पूर्णपणे पराभवाच्या खाईत लोटले. अद्याप रशीदचे संकट यायचे बाकी होते तोवरच त्यांची अवस्था पाच बाद 36 अशी झाली होती. यातल्या चार फलंदाजांना भोपळा सुद्धा फोडता आला नव्हता.

दुसऱ्या बाजूने रशीद येताच त्याने आपल्या पहिल्याच षटकात बळी मिळवला तर मूजीबने आपल्या चौथ्या षटकात पाचवा बळी मिळवून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यामुळे अफगाणिस्तान संघाचा विजय स्पष्टपणे दिसायला लागला होताच. फक्त तो कधी इतकीच औपचारिकता बाकी होती. ते काम रशीद खानने पूर्ण करत आपल्या खात्यात आणखी चार 20/20बळी ऍड  करत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. तर केवळ 20 वर्षाचा युवा मुजीब आपल्या सर्वोत्तम गोलंदाजीमुळे विजयाचा आणि सामन्याचाही मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.