सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : तीन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर महापालिकेचे 7,390 कोटींचे 2020-21 चे अंदाजपत्रक एकमताने मंजूर

एमपीसी न्यूज – तीन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर पुणे महापालिकेचे 7 हजार 390 कोटींचे अंदाजपत्रक बुधवारी एकमताने मंजूर करण्यात आले. 50 सर्व पक्षीय नगरसेवकांनी या अंदाजपत्रकावर आपले विचार मांडले.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, सुनील कांबळे आमदार झाल्यावर मला पक्षाने स्थायी समिती अध्यक्ष पदाची संधी दिली. त्या दोन ते अडीच महिन्यांत माझी भूमिका ‘नाईट वॉचमनची’ होती. सुरुवातीपासून माझी भूमिका महसूल वाढीची होती. गेली अनेक वर्षे दीड ते 2 हजार कोटी बजेटमध्ये तूट येते. त्याचा मी अभ्यास केला. महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. 25 ते 30 वर्षे लोकप्रतिनिधी राहिलेल्या उमेदवारांशी चर्चा केली.

50 ते 60 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात चार ते साडेचार हजार कोटी अंदाजपत्रक अतिशय कमी आहे. आज मला आत्मविश्वास आहे, हा सर्व अर्थसंकल्प महसूल जमा होण्यावर आहे. प्रस्तावित प्रकल्प का पूर्ण होत नाही, याचा अभ्यास करत आहोत. चला आपण सर्व एकत्र येऊ, आणि या पुणे शहराचा विकास करू, असे आवाहनही त्यांनी केले.

सभागृह नेते धीरज घाटे म्हणाले, वास्तवाला धरून सामान्य पुणेकरांसाठी हा अर्थसंकल्प आहे. महसूल वाढीचा निर्णय त्यांनी घेतला. छोट्या बसमधून मध्य पुण्यात 10 रुपयांत प्रवास, ही योजना उत्तम आहे. त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली. नदीसुधार, नानाजी देशमुख सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करणे, बालकांसाठी हृदयरोग निदान चाचणी महत्वपूर्ण योजना आहे.

सारसबाग चांगले पर्यटनस्थळ करायचे आहे. 10 – 12 वी शुल्क भरणे, व्याख्यानमाला, अनेक योजना या अंदाजपत्रकात आहेत. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा फोटो काढायला त्यावेळचे सत्ताधारी निघाले होते. त्यावेळी जनशक्तीने प्रचंड विरोध केला होता. तुमची 50 वर्षे सत्ता असताना कित्येकजण तुरुंगात गेले, याची आठवण विरोधकांना करून दिली.
पंतप्रधान आवास योजना ही नरेंद्र मोदी यांची महत्वपूर्ण योजना आहे. सर्वसामान्य पुणेकरांना या योजनेतून घर देण्यात येणार आहे.

spot_img
Latest news
Related news