Pune : ….अखेर त्यांच्याही आत्म्यांनाही लाभली शांती

सर्वपित्री अमावस्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) च्या वतीने बेवारस मृतांच्या अस्थींचे विधीवत पूजन आणि विसर्जन

एमपीसी न्यूज – अपघातामध्ये किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनेकजण मृत्यूमुखी पडतात. काही मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड असते. त्यामुळे असे मृतदेह बेवारस अवस्थेतच राहतात. आप्तेष्ट, नातेवाईक कोणीही नसल्याने त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार देखील होत नाहीत. अशा बेवारस मृतदेहांच्या अस्थी विसर्जित कोण करणार?

असा विचार मनात घेऊन मागील सात वर्षांपासून सातत्याने बेवारस मृतांच्या अस्थी विधीवत विसर्जित करण्याचा हा स्तुत्य उपक्रम राष्ट्रीय कला अकादमी अखंडपणे राबवित आहे. मृत व्यक्तीची जात कोणती हे न बघता, जाती-धर्माच्या पलीकडे जात सद्भावनेतून कलाकारांनी अस्थींचे विधीवत विसर्जन केले. अखेर प्रतीक्षा संपली आणि त्या बेवारस मृतांच्या आत्म्याला शांती लाभली.

सर्वपित्री अमावस्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास)तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधीवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, अंकित काणे, हर्षद धर्माधिकारी, नितीन पंडित, डॉ. मिलींद भोई, पियुष शहा, कुमार रेणुसे, बाळा शुक्ला, विश्वास भोर, अक्षय माने, राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर,सदाशिव कुंदेन, रोमा लांडे, योगेश गोलांडे, अतुल सोनवणे, अमर लांडे, सुप्रिया मुरमुरे, विवेक टिळे यांसह महानगरपालिकेचे सेवक विक्रम सरोदे, नागेश लांडगे, अजय चव्हाण उपस्थित होते.

मंदार रांजेकर म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधीवत पूजन व विसर्जन केले जाते. या उपक्रमाचे हे ८ वे वर्ष आहे. पुण्यामध्ये अनेक बेवारस मृतदेह येतात त्यांचे कोणीही नसते. त्यामुळे त्यांचे अंतीम विधी विधीवत होत नाहीत. अशा मृतांच्या अस्थी विधीवत विसर्जित करून त्यांना शांती लाभावी यासाठी सर्वपित्री अमावस्येला या अस्थी विधीवत विसर्जित केल्या जातात. समाजापर्यंत हा उपक्रम पोहोचावा तसेच त्यांनी देखील अशाप्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. सदाशिव कुंदेन म्हणाले, बेवारस मृतांच्या अस्थींचे विधीवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभावी यासाठी मंत्रोच्चार आणि अध्यायांचे पठण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.