Ford Shutdown : जनरल मोटर्स, हार्ले डेव्हिडसन नंतर फोर्ड कंपानीने गुंडाळला भारतातून गाशा!  

एमपीसी न्यूज – जनरल मोटर्स, हार्ले डेव्हिडसन नंतर आता जगातील आघाडीच्या फोर्ड कंपानीने भारतातून आपला गाशा गुंडाळला आहे. फोर्ड कंपानीने साणंद (गुजरात) आणि चेन्नई (तमिळनाडू) येथील आपले दोन्ही प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला 10 वर्षात दोन अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा तोटा झाला असल्याने कंपनीने भारतातील प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, आर्थिक उदारीकरण झाल्यानंतर 1991 मध्ये फोर्ड कंपानी भारतात आली, त्यानंतर आज जवळपास तीस वर्षांनंतर कंपनी भारतातून जात आहे. यामुळे जवळपास चार हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रतिस्पर्धी महिंद्रा अँड महिंद्राकडे ऑपरेशन हस्तांतरित करण्याच्या चर्चेनंतर काही महिन्यांनी फोर्डने आपली घोषणा केली आहे. फोर्डने ओला सोबत देखील इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी चर्चा केली होती पण,   ओलाने एकटं जाण्याचा निर्णय घेत स्वतःची गिगाफॅक्टरी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

फोर्ड इंडिया कंपानीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग म्हलोत्रा यांनी सांगितले की, ‘कंपनीला मागील काही वर्षांपासून होत असलेला तोटा आणि अपेक्षित असलेला नफा मिळत नसल्याने प्लांट बंद करण्याच्या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. कंपनीचे भारतातील ग्राहक, डिलर्स यांच्या सोबत कंपनी काम करत राहील. असं म्हलोत्रा यांनी स्पष्ट केले.

ऑगस्ट महिन्यात फोर्ड कंपानीचा भारतीय बाजारपेठेतील वाटा 1.4 टक्के एवढा होता. तर, जापनीज कंपनी मारुती सुझुकी आणि दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाई यांचा वाटा 60 टक्के एवढा होता.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.