Pune News : पानिपत युद्धानंतर मराठयांची खरी ताकद जगाला समजली ; इतिहास अभ्यासकांचे मत

एमपीसी न्यूज – पानिपत युद्धावेळी मराठ्यांनी वेळोवेळी आखलेली रणनिती, युद्धाचा भौगोलिक भाग, युध्दात वापरलेली शस्त्र आणि युध्दशास्त्र, शत्रू सैन्यावर केलेली चाल, त्याकाळात घडलेले राजकारण, इंग्रजांची व इतर संस्थांनांची भूमिका याचा उहापोह करताना इतिहास संशोधन मंडळात पानितपताचा इतिहास उलगडला. पानिपतच्या या मोठया युद्धानंतर मराठयांची खरी ताकद जगाला समजली, असे मत इतिहासतज्ञ व अभ्यासकांनी खुल्या चर्चासत्रात मांडले.

इतिहास संस्कृती कट्टा व डॉ.चंद्रशेखर गणेश पेशवे यांच्यावतीने महाराष्ट्र धर्माचा परिपाक पानिपतचे तिसरे युद्ध याविषयावरील खुल्या चर्चासत्राचे आयोजन इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी घन:श्याम ढाणे, शिवराम कार्लेकर, उमेश जोशी, विद्याचरण पुरंदरे चर्चासत्रात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला अ‍ॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई, संदीप परांजपे, विशाल खुळे, महेश फळसणकर, तुकाराम चिंचणीकर, डॉ.गिरीश मांडके, डॉ.सचिन जोशी, सचिन दाते, माधव देशपांडे आदी उपस्थित
होते. पानिपत युध्दाबद्लचे अनेक प्रश्न उपस्थितांनी विचारले.

शिवराम कार्लेकर म्हाणाले, ‘पानिपत युद्धापूर्वी अहमदशाह अब्दाली म्हणतो की, मी दिल्ली पर्यंत थांबणार नाही, दक्षिणेत उतरून मराठ्यांना जिंकायचे आहे. परंतु पानिपत युद्धानंतर दिल्ली तुम्ही घ्या, मी इथून पुढे जाणार नाही, असे अनेक पत्र व्यवहार झालेले आपल्याला आढळतात. त्यामुळे पानिपतानंतर मराठ्यांची खरी ताकद अब्दालीला देखील कळाली. युध्दात जितके नुकसान मराठ्यांचे झाले, तितकेच शत्रू सैन्याचे देखील झाले.’

उमेश जोशी म्हणाले, ‘इतिहासाचा अभ्यास करताना फक्त चित्रपट पाहण्यापेक्षा किंवा कादंब-या वाचण्यापेक्षा सखोल अभ्यास करायला हवा. इतिहासातील पत्र व्यवहाराचे संदर्भ देखील अभ्यासायला हवेत. त्यातून आपल्याला इतिहासाचा सखोल व अचूक अभ्यास करता येईल, असेही त्यांनी सांगितले. इतर मान्यवरांनी देखील पानिपत युद्धाबद्दलची आपले मते उपस्थितांसमोर मांडली.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.