Dapodi Crime News: गाडीला धक्का लागल्यावरुन भांडण, टोळक्याची चौघांना मारहाण

एमपीसी न्यूज – कारचा धक्का लागून अॅक्टिवा गाडीची हेडलाईट, आरसा फुटल्याने झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. 20 ते 30 जणांच्या टोळक्याने चौघांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री 11 च्या सुमारास बाराते वस्ती, दापोडी येथे घडली.

याप्रकरणी करण राजेंद्र बाराते (वय 36, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार साहिल मनिष वाल्मीकी (वय 25, रा. लिंबोरे वस्ती, दापोडी) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर, त्याचे साथीदार सिकंदर उर्फ चिक्कु अख्तर शेख (वय 23, रा. दापोडी), अमर राजु सुरवसे (वय 21, पवारवस्ती, दापोडी), संकेत ज्ञानेश्वर दांडेकर (वय 20, रा. दापोडी) अटकेत आहेत.

फिर्यादीचे चुलते सुभाष बाराथे, प्रकाश बाराथे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस थांबले होते. आरोपी कारमधून तिथे आले. आरोपींच्या कारचा फिर्यादी करण याच्या अॅक्टिवा गाडीला धक्का लागला. त्यात गाडीची हेडलाईटचे काच, आरसा फुटला. त्यावरुन तेथे वाद झाला.

आरोपींनी फिर्यादी करण, त्याचे वडील राजेंद्र, चुलते यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. एका आरोपीने लोखंडी हत्यार रविंद्र बाराथे यांच्या हाताच्या कोपराजवळ मारुन दुखापत केली. सुभाष बाराथे यांना जमीनीवर आपटून मारहाण केली. या मारहाणीत चौघांना मुका मार लागला. आरोपींनी परिसरात दशहत निर्माण केली, मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.