Chinchwad : राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालानंतर शहरात शांतता राखा

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशभर चर्चेत असलेला राम जन्मभूमी – बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे. हा खटला देशाची सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत जो निर्णय देणार आहे, त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाने आदर करायला हवा. या निकालानंतर या प्रकरणावर समाजात, सोशल माध्यमांवर टीका-टिपण्णी अथवा धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे. न्यायालयाचा अवमान करणा-यांवर तात्काळ कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

राम जन्मभूमी – बाबरी मशीद या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. हा निकाल जागेसंदर्भात असणार आहे. न्यायालय जो निकाल देईल त्या निकालानंतर निकालाचा अवमान केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. न्यायालयाचा अवमान केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास तसेच समाजात जातीय तेढ निर्माण केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम 295 (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे, अगर ते अपवित्र करणे), कलम 295 (अ) (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अवमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्पर व दुष्ट उद्देशाने कृती करणे), कलम 298 (धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धिपुरस्पर उद्देशाने शब्द उच्चारणे) तसेच इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील.

गुन्हे दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे व सायबर सेलचे बारीक लक्ष आहे.

शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करा –

# जमाव करून थांबू नये
# सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत
# निकालानंतर गुलाल उधळू नये
# फटाके वाजवू नयेत
# सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत
# महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये
# निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नये
# घोषणाबाजी, जल्लोष करू नये
# मिरवणुका, रॅली काढू नये
# भाषणबाजी करू नये
# कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने कोणतेही शब्द उच्चारू नये
# समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे जुने व्हिडिओ, फोटो प्रसारित करून अफवा पसरवू नये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.