Wakad : तुरुंगातून सुटल्यावर पकडलेली चोरीची वाट पुन्हा तुरुंगातच गेली

घरफोडी करणा-या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट चारकडून अटक

एमपीसी न्यूज – चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून एक कैदी तुरुंगातून सुटला. शिक्षा भोगल्यावर देखील त्याची चोरीची हौस गेली नाही. त्याने पुन्हा चोरीची वाट पकडली. ही वाट त्याला पुन्हा तुरुंगात घेऊन गेली. पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणा-या सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली.

गणेश उर्फ अण्णा दगडू शिंदे (वय 26, रा. ओटास्कीम, निगडी), असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चोरट्याकडून 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, महागडी घड्याळे आणि घरफोडी करण्याचे साहित्य, असा एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळाखडक येथे एक घरफोडीचा गुन्हा घडला. या गुन्ह्याचा तपास वाकड पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सुरु केला. वाकड परिसरात सोळा नंबर बस स्टॉप जवळ एक तरुण मोबाईल विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती पोलीस हवालदार नारायण जाधव यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी परिसरात सापळा रचून गणेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोबाईल फोनबाबत पोलिसांनी चौकशी केली असता तो चोरीचा असल्याचे सांगितले. त्यावरून त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन घड्याळे, एक मोबाईल फोन आणि घरफोडी करण्याचे साहित्य असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. जप्त केलेला ऐवज आरोपीने काळाखडक येथून चोरी केल्याचे सांगितले.

आरोपी गणेश या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी निगडी आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, भोसरी, सांगवी, भोसरी एमआयडीसी, देहूरोड, हिंजवडी, चिंचवड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला या गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर देखील त्याने चोरीचे सत्र सुरु केले आणि तो पुन्हा कारागृहात गेला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, संतोष आसवले, शावरसिद्ध पांढरे, लक्ष्मण आढारी, तुषार काळे, अतुल लोखंडे, धर्मराज आवटे, संजय गवारे, धनाजी शिंदे, अजिनाथ ओंबासे, वासुदेव मुंढे, सुरेश जायभाये, आदिनाथ मिसाळ, सुनील गुट्टे, गोविंद चव्हाण, नितेश बिच्चेवार, नाजूका हुलावळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like