Alandi : पाटाचे पाणी अडवल्यावरून दोन गटात हाणामारी

परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाटाचे पाणी अडवल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी खेड तालुक्यातील गोलेगाव येथे भैरोबा मंदिराजवळ घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा नोंदवला. दोन्ही गुन्ह्यात एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल दत्तात्रय चौधरी (वय 41, रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय दशरथ चौधरी, रामदास परसराम चौधरी, रेश्मा रामदास चौधरी, रेखा संजय चौधरी, जाईबाई दशरथ चौधरी (सर्व रा. गोलेगाव, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाटाचे पाणी अडवण्यावरून वाद झाला. यामध्ये आरोपींनी लाकडी काठ्यांनी व दगडाने मारून अनिल यांना मारहाण केली. यामध्ये अनिल यांच्या कपाळाला, हात व पायाला गंभीर दुखापत झाली.
याच्या परस्पर विरोधात संजय दशरथ चौधरी (वय 43) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार राजाराम देवराम चौधरी, किरण सुनील चौधरी, दत्तू बाबुराव चौधरी, अंकुश भास्कर चौधरी, लहू भास्कर चौधरी, मोन्या संजय चौधरी, सुरज सुनील चौधरी, वैशाली राजाराम चौधरी, सारिका अनिल चौधरी, रखमा देवराम चौधरी, मालती भावड्या चौधरी, विकास दत्तू चौधरी (सर्व रा. गोलेगाव, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अनिल याने संजय यांना ‘तू काल पोलीस चौकीत शहाणपणा करीत होता. तुला लै माज आलाय का, तुझ्याकडे बघतो’ अशी दमदाटी केली. तसेच अनिल याने त्याच्या इतर आरोपी साथीदारांना फोन करून बोलावून संजय यांना लाकडी काठयांनी व लाथाबुक्क्यांनी मारून दुखापत केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.