Maharashtra: राज्यातील 450 किमी रस्ते कामांसाठी आशियाई बँक आणि केंद्र सरकारमध्ये करार

Agreement between Asian development Bank and Central Government for 450 km of roads in Maharashtra

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील 450 किमी राज्य महामार्ग तसेच महत्त्वाच्या जिल्हा मार्ग सुधारणा कामांसाठी आशियाई विकास बँक (एडीबी) आणि भारत सरकार यांच्यात 177 दशलक्ष डॉलर्सच्या ऋण करारावर स्वाक्षरी झाली.

महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी समीर कुमार खरे, अतिरिक्त सचिव (फंड बँक व एडीबी), आर्थिक व्यवहार विभाग, अर्थ मंत्रालय यांनी भारत सरकारच्या वतीने तर एडीबीचे ‘इंडिया रेसिडन्ट मिशन’चे भारतातील संचालक केनीची योकोयामा यांनी एडीबीच्या वतीने यावर स्वाक्षऱ्या केल्या.

या प्रकल्पामुळे राज्यातील शहरी केंद्रे व ग्रामीण भाग यांच्यातले दळणवळण वाढून ग्रामीण समुदायाला बाजारपेठ प्रवेश, रोजगाराच्या संधी व सेवा अधिक चांगल्या उपलब्ध होण्यासाठी मदत होईल, असे खरे यांनी यावेळी सांगितले.

दळणवळण वाढल्याने राज्यातल्या महत्वाच्या शहरी केंद्रांच्या बाहेर, द्वितीय श्रेणी शहरातही विकासाचा व उपजीविकेच्या संधींचा विस्तार होईल. त्यामुळे उत्पन्नातील असमानता कमी होईल.

या प्रकल्पामुळे रस्ते सुरक्षा तपासणी जाळे विकसित करून रस्ते सुरक्षा उपाययोजना बळकट होतील. आंतरराष्ट्रीय उत्तम पद्धतींचे अनुकरण केल्याने वृद्ध, महिला व बालके यांचे यामुळे संरक्षण होईल, असे योकोहामा यांनी सांगितले.

अद्ययावत रस्ते देखभाल यंत्रणा हे या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांचा दर्जा व सेवा टिकवून ठेवण्यासाठी कंत्राटदाराला 5 वर्षासाठी कामगिरीवर आधारित देखभाल जबाबदारी सोपवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

या प्रकल्पातून महाराष्ट्रात सुमारे 450 किलोमीटरचे 2 प्रमुख जिल्हा रस्ते, 11 राज्य महामार्ग सुधारणा कामे तसेच सात जिल्ह्यात दुपदरीकरणाची व राष्ट्रीय महामार्ग, बंदरे, विमानतळ, रेल्वे हब, आंतरराज्य रस्ते, जिल्हा मुख्यालये, औद्योगिक विभाग, उद्योजकता समूहकेंद्रे, कृषी क्षेत्रापर्यंत पोहोचण्याची सुविधा वाढवण्यात येईल.

रस्ते आरेखन, रस्ते देखभाल आखणी व रस्ते सुरक्षितता क्षेत्रात, आपत्ती तसेच बदलत्या हवामानातही टिकून राहण्याची क्षमता राखणे, यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग प्रकल्प कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतही या प्रकल्पाअंतर्गत लक्ष पुरविण्यात येणार आहे.

दारिद्र्य निर्मुलनासाठीचे प्रयत्न सुरु ठेवतानाच समृध्द, समावेशक, स्थितीस्थापक व शाश्वत आशिया व पॅसिफिकसाठी ‘एडीबी’ कटिबद्ध आहे. 1966 मधे स्थापन झालेल्या एडीबीचे 68 सदस्य आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.