-MPC-TOP-MOST-BANNER-I

Ahmadnagar : रविवारी ‘शिक्षक प्रतिभा कुटुंब स्वास्थ्य संमेलन’

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- सद्यस्थितीत कुटुंबाचे होणारे विघटन, वृद्धाश्रम आणि पाळणाघरांची वाढती संख्या, भारतीय संस्कृतीचा ऱ्हास यावर चिंतन व्हावे या उद्देशाने आशिया मानवशक्ती विकास संस्था आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने 16 डिसेंबरला ‘शिक्षक प्रतिभा कुटुंब स्वास्थ्य संमेलन’ भरविण्यात आले आहे. यामध्ये शैक्षणिक मूल्य आणि आजची कुटुंब व्यवस्था यावर विचारमंथन होणार आहे. तसेच कविसंमेलन, कथाकथन होणार आहे.

अहमदनगर, राळेगणसिद्धी ट्रेनिंग सेंटर येथे रविवारी होणा-या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. गिरीश प्रभुणे असणार आहेत. पद्मभूषण तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर, लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय ट्रेनर बी. एल. जोशी, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, नागेश वसतकर उपस्थित असणार आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना यशवंतराव चव्हाण ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर, महाराष्ट्रातील झिरो एनर्जी शाळा असलेल्या शिक्रापूर, वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला ‘संस्कारक्षम’ शाळेचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

पहिल्या सत्राला दुपारी बारा वाजता सुरुवात होणार आहे. ‘आयुष्याच्या वळणावर’ कविसंमेलन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित कवी भरत दौंडकर उपस्थित असणार आहेत. तर, ख्वाडा आणि हैद्राबाद कस्टडी फेम गीतकार विनायक पवार, कवी अरुण पवार, कवी प्रा. अशोकराव शिंदे सहभागी होणार आहेत. त्यानंतर कथाकथन होणार असून डॉ. अशोक शिलवंत, ज्येष्ठ कथाकार संजय कळमकर कथाकथन करणार आहेत.

दुपारी अडीच वाजता विचारमंथनाने दुस-या सत्राला सुरुवात होणार आहे. ‘शैक्षणिक मूल्य आणि आजची कुटुंब व्यवस्था’ या विषयावर मंथन होणार आहे. कवयित्री आणि समीक्षक मानसी चिटणीस प्रास्ताविक करणार आहेत. तर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस मार्गदर्शन करणार आहेत.

संमेलनाचे निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले, मुरलीधर साठे, प्रा. दिगंबर ढोकले आहेत. तर, संयोजनात मुकुंद आवटे, अरुण इंगळे, अनिल कातळे, राजेंद्र वाघ यांनी पुढाकार घेतला आहे. संयोजन समितीतील अॅड. सतीश गोरडे, श्रीकृष्ण अत्तरकर, जयवंत भोसले, रोहित खर्गे, डॉ. अनू गायकवाड, राजेश भड, डॉ. रोहिदास आल्हाट, अरुण गराडे, बाजीराव सातपुते, हनुमंत देशमुख, दिलीप वर्मा, संदीप कानडे यांची लाभत आहे. तर, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, अ.भा. मराठी नाट्य परिषद भोसरी यांचे सहकार्य लाभत आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.