Ahmednagar: ‘परश्या’च्या नावाने FB अकाऊंट बनवून महिलेला दीड लाखांचा गंडा, माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

Ex corporators son arrested for making fake Facebook account in the name of marathi actor and deceive woman for 1 5 lakh in ahmednagar

एमपीसी न्यूज- सैराट या मराठी चित्रपटात ‘परश्या’ची भूमिका केलेला अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून एका महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चिंचवडमधील एका दिवंगत माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक केली आहे. ही घटना ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत घडली. अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय 25, रा. मोहननगर, चिंचवड स्टेशन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदर्शन चव्हाण याने अभिनेता आकाश ठोसर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यानंतर अहमदनगर येथील एका महिलेसोबत फेसबुकद्वारे मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर संबंधित महिलेकडून सोन्याचे एक मंगळसूत्र व हातातील अंगठी असे सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने परत करण्याच्या बोलीवर घेतले. शिवदर्शन चव्हाण हा दागिने घेण्यासाठी नगरला आला होता. तेव्हा त्याने ‘मला आकाश ठोसर याने पाठवले आहे’ असे संबंधित महिलेला सांगितले होते.

प्रत्यक्षात मात्र दागिने परत न केल्याने संबंधित महिलेला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेतली. अहमदनगर सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

या पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता महिलेची फसवणूक करणारा संबंधित आरोपी हा पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने चिंचवड येथे जाऊन चव्हाणला ताब्यात घेतले.

चव्हाणकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून संबंधित महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.