Chikhali News: सत्ताधा-यांच्या चुकीच्या कारभारामुळे चिखलीत पाण्याची गंभीर परिस्थिती – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. अपुरा पाणीपुरवठा होत आहे. रस्त्यांचीही दुरावस्था आहे. त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. सत्ताधारी भाजपने मागील साडेचार वर्षात चिखली परिसरातील विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही परिस्थिती आज ओढावली. भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून बंद पाईपलाईनमधून पुणे महापालिका पाणी आणू शकली. पण, पिंपरी महापालिका पाणी आणू शकली नाही. त्यामुळे पाण्याची परिस्थिती उद्भवली असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले.

चिखलीतील अपुरा पाणीपुरवठा आणि देहू आळंदी रोड ते मेमोर सोसायाटीकडे जाणा-या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाविरोधात विकास साने यांनी आज (गुरुवारी) चिखलीत लाक्षणिक उपोषण केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला. अॅड. प्रकाश मोरे, पींट्टू मोरे, आनंद मोरे आणि परिसरातील गृहनिर्माण सोसायटीतील सभासद यावेळी उपस्थित होते.

अजित गव्हाणे म्हणाले, ”चिखली भागातील रस्त्याची परिस्थिती फार वाईट आहे. महापालिकेचे बजेट सात हजार कोटी रुपयांचे आहे. रस्ते ताब्यात आले, तरी ते विकसित झाले नाहीत. रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष केले. भाजपने चिखली परिसरातील विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही परिस्थिती आज ओढावली आहे. पाण्याची भयानक परिस्थिती या परिसरात आहे. भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून 267 एमएलडी पाणी कोटा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी 2011 मध्ये मंजूर केला. त्याचवेळी पुणे महापालिकेसाठी सुद्धा पाणी आरक्षणाला मंजुरी दिली होती. एकाचवेळी दोन्ही महापालिकांना परवानगी मिळाली. पुणे महापालिकेने भामा आसखेडमधून बंद पाईपलाईनमधून पुणेकरांसाठी पाणी नेले. पण, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काम पूर्ण झाले नाही”.

”भामा-आसखेडची एकत्रित पाईपलाईन आणली असती. तर, पिंपरी-चिंचवड शहरालाही लवकर पाणी मिळाले असते. परंतु, महापालिकेतील सत्ताधारी भाजपने एकत्रित पाईपलाईनला नकार दिला. कारण, त्यांना निविदेत रस होता. बंद पाईपलाईनमधून पाणी आणण्याचे आजही कोणतेही नियोजन नाही. तळवडेतील जॅकवेलचे, चिखलीत संपचे काम चालू आहे. बंद पाईपलाईनने पाणी आणले असते. तर, जॅकवेलचा खर्च वाचला असता. चुकीच्या पद्धतीने कारभार केल्यामुळे ही परिस्थिती ओढविली आहे. सत्ताधा-यांच्या निष्क्रियपणामुळे चिखलीतील नागरिकांना पाणी मिळाले नाही”, असे गव्हाणे म्हणाले.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विकास साने नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने भांडत असतात. केवळ निवडणुकीपूरते ते काम करत नाहीत. सातत्याने नागरिकांसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात. प्रभागातील काम नसले. तरी ते काम करतात, असेही गव्हाणे म्हणाले.

नागरिकांना वेठीस धरले जात आहे – वाघेरे

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”चिखलीतील दैनंदिन प्रश्न सुटत नाहीत. हे दुर्दैव आहे. अधिका-यांशी चर्चा करुन तातडीने प्रश्न सोडविण्याची विनंती केली. दोन दिवसात प्रश्न सुटले नाही. तर, आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे. राजकारण बाजूल ठेऊन हे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. नागरिकांना वेठीस धरले जात आहे. एक नागरिक खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाले. भाजपच्या पुढा-यांना जाग आली पाहिजे. विकास साने जनतेसाठी लढत असून पक्ष त्यांच्यासोबत आहे”.

सुविधा देणार नसाल तर आमच्याकडून कर घेऊ नका – विकास साने

विकास साने म्हणाले, ”चिखली गावात पाणी, रस्त्याची समस्या आहे. चिखलीतील सर्व रस्ते खराब झाले आहेत. पालिकेने खड्डेविरहित रस्ता दाखविला. तर, फाऊंडेशनतर्फे पाच लाखाचे बक्षिस दिले जाईल. पाण्याची समस्या भीषण आहे. गावातील दहा लोकही पाणीपुरवठ्यावर समाधानी नाहीत. नागरिकांच्या तक्रारींकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. खड्डे, ड्रेनेजच्या पाण्यात बसून उपोषण केले. तरी, प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आम्ही करोडो रुपये कर भरतो. पण, आम्हाला सुविधा दिल्या जात नाहीत. सुविधा देणार नसाल तर आमच्याकडून कर घेऊ नका”,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.