Pimpri News :  ठाण्यातील स्मार्ट सिटीच्या कामाची चौकशी तर पिंपरी-चिंचवड मधील का नाही? – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामात मोठी अनागोंदी, अनियमितता, भ्रष्टाचार झाला आहे. तब्बल 250 कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यता घेतली नसल्याचे समोर आले. स्मार्ट सिटीच्या वस्तू बाजारभावापेक्षा चढ्या दराने खरेदी केल्या आहेत. भाजपच्या ताब्यातील महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी करण्याची वारंवार मागणी करूनही केंद्र सरकारकडून दखल घेतली जात नाही. मात्र, शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाण्यातील स्मार्ट सिटीच्या कामाची केंद्र सरकारने चौकशी सुरू केल्याचे भाजप खासदाराने सांगितले. ठाण्याप्रमाणेच केंद्र सरकारकडून पिंपरी- चिंचवड मधील स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी का केली जात नाही, असा सवाल यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी केला.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अजित गव्हाणे म्हणाले, स्मार्ट सिटी ही केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेत सुमारे 1300 कोटी रुपयांची विकास कामे केली जाणार आहेत. केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 25 आणि महापालिका 25 टक्के हिस्सा देत आहे. पात्र असूनही सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नव्हता. त्यावेळी देशाचे नेते शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री वैंकय्या नायडू यांची भेट घेतली. त्यावेळी नायडू यांनी पिंपरी-चिंचवडला संधी देण्याचे आश्वासन पवार साहेबांना दिले होते.

नवी मुंबई शहर स्मार्ट सिटीतून बाहेर पडल्यानंतर पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला. महापालिकेत 2017 मध्ये भाजपची सत्ता आली. भाजपने स्मार्ट सिटीच्या कामांसाठी स्वतंत्र कंपनी सुरू केली. कंपनीच्या माध्यमातून कारभार केला जात आहे. स्मार्ट सिटीतील 1353 कोटी रुपयांचे काम चार कंपन्यांना दिले होते. त्यात टेक महिंद्रा, एल अॅन्ड टी, बी.जी.शिर्के आणि बेनेट कोलमेन या कंपन्यांना काम दिले.

अंमलबजावणीत मोठा घोळ झाला आहे. नियम पाळले नाहीत. एल अॅन्ड टी कंपनीला दिलेल्या कामाला तांत्रिक मान्यता घेतली नाही. खोदाई चुकीच्या पद्धतीने केली. मानकाप्रमाणे साहित्य वापरले नाही. कोणतेही नियम पाळले नाहीत. या कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन करुन उपठेकेदार नेमले आहेत. याची सखोल चौकशी झाल्यानंतर निश्चितपणे त्यात दोषी आढळतील, असे गव्हाणे यांनी म्हटले आहे.

मागील पाच वर्षांत स्मार्ट सिटीचा एकही प्रकल्प पूर्ण झाला नसल्याचे कंपनीच्या सीईओ यांनी मान्य केले. अतिशय संथगतीने कामे सुरू आहेत. नागरिकांच्या सेवेत एकही प्रकल्प नाही. विकासकामाऐवजी भ्रष्टाचार, अनागोंदीच्या कारभारामुळेच स्मार्ट सिटी शहरात चर्चेत आहे.

स्मार्ट सिटीतील काम भाजपच्या एका आमदाराशी संबधीत कंपनीला काम दिले आहे. त्या कंपनीने खरेदीत मोठा घोटाळा केल्याचे आरोप झाले. सल्लागार कंपनीवर कोट्यावधी रुपये उधळले आहेत. बाजारभावापेक्षा चढ्यादराने वस्तुंची खरेदी केली. सर्वात गंभीर बाब म्हणजे 250 कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यताच घेतली नाही. स्मार्ट सिटीच्या कामात सुमारे 700 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकार, ईडीकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली. पण, केंद्र सरकारने चौकशी सुरू केली नाही.

शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाण्यातील स्मार्ट सिटी योजनेच्या कामाच्या चौकशीचे आदेश केंद्रीय नगरविकास मंत्र्यांनी दिल्याचे भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. पण, भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी- चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटीतील कामात मोठा गैरव्यवहार केला आहे. केंद्र सरकारने येथील कामाचीही चौकशी करावी अशी मागणी गव्हाणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.