Pimpri News: विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित गव्हाणे, राजू मिसाळ, वैशाली घोडेकर यांच्यात रस्सीखेच

Ajit Gavhane, Raju Misal, Vaishali Ghodekar In competition of Leader of Opposition राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकाधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी इच्छुकांची नावे मागविली आहेत. यामुळे नवीन विरोधी पक्षनेता कोण असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, वैशाली घोडेकर यांच्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकाधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नाना काटे यांचा कार्यकाल संपल्याने अजित पवार यांनी इच्छुकांची नावे मागविली आहेत.

त्यामुळे इच्छूकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. केवळ 15 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे एकाला 7-7 महिने संधी दिली जाते का, पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक पाच गवळीनगरचे पालिकेत प्रतिनिधीत्व करणारे अजित गव्हाणे विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. गव्हाणे पहिल्यांदा भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पहिल्याचवर्षी त्यांना राष्ट्रवादीने स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यांनी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माणअंतर्गत (जेएनएनयूआरएम)शहरात विकास कामे केली.

या कामांमुळे शहराचा कायापालट झाला. गव्हाणे यांनी स्थापत्य अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले आहे. माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. सर्वांत महत्वाचे म्हणजे आमदार महेश लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे यांचा पराभव करुन राष्ट्रवादीच्या चिन्हावर अजित गव्हाणे निवडून आले आहेत.

अभ्यासू, मितभाषी, सर्वांना सामावून घेणारे अशी त्यांची ओळख आहे. मात्र, आक्रमकता नसणे ही त्यांची उणीवेची बाजू आहे. स्थायी समितीनंतर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून त्यांना कोणतेही महत्वाचे पद मिळाले नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी इच्छा त्यांनी अजितदादांकडे व्यक्त केली आहे.

प्रभाग क्रमांक नऊ मासूळकर कॉलनी, नेहरुनगरमधून दुस-यावेळी निवडून आलेल्या वैशाली घोडेकर माजी महापौर आहेत. 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्या अपक्ष निवडणूक लढल्या. पण, थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

मात्र, उमेद न हारता 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्या दुस-यावेळी निवडून आल्या आहेत. माळी समाजाचा आक्रमक चेहरा ही त्यांची ओळख आहे. डॉक्टर, विद्याविभुषित असलेल्या घोडेकर सभागृहात आक्रमक भूमिका घेतात.

पुणे पालिकेत राष्ट्रवादीने दिपाली धुमाळ यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली आहे. महिलेला संधी दिली. त्यामुळे येथेही महिलेला संधी द्यावी. तीन पुरुषांना संधी दिल्याने आता महिलेला संधी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

तिसरे इच्छुक राजू मिसाळ भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या प्रभाग क्रमांक 15 प्राधिकरणातून सलग तिस-यावेळी निवडून आले आहेत. उपमहापौर, क्रीडा समिती सभापतीपद त्यांनी भूषविले आहे. विरोधात असताना सलग दोन वर्ष ते स्थायी समितीचे सदस्य होते.

अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभेतील प्रचारात त्यांनी हिरिरीने पुढाकार घेतला होता. त्यामुळे अजितदादांची त्यांच्यावर विशेष मर्जी आहे. ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

दरम्यान, पालिकेची आगामी निवडणूक 15 महिन्यांवर येवून ठेपली आहे. जनतेसमोर जायचे आहे. त्याची गणिते समोर ठेवूनच पक्षश्रेष्ठी विरोधी पक्षनेता निवडतील. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, चुकीच्या कामाला प्रखर विरोध करणा-या अभ्यासू नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता आहे.

या तिघापैकी कोणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडते की ऐनवेळी वेगळ्याच नगरसेवकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवितात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.