Pimpri News : सर्वसामान्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दलही राजकारण करणा-यांच्या बुद्धीची कीव येते – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज : केंद्र, राज्य सरकार असो की महापालिका यांच्याकडून जाहीर होणा-या योजना जनतेच्या कररुपी पैशांतून राबविल्या जातात. त्यावर कोणत्या एका पक्षाचा अधिकार नसतो. या योजनांचा तळागाळातील लोकांना लाभ मिळवून देणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. लोकहितासाठी केलेल्या कामाबद्दलही खालच्या स्तरावर जाऊन समाजमाध्यमांवर उलट-सुलट लिहिले जात असेल. तर, हे मोठे दुर्देव आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणा-यांच्या बुद्धीची कीव येते, अशा शेलक्या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड देण्यावरुन टीका करणा-यांना उत्तर दिले.

नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून भोसरीतील 1700 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नागरिकांना विमा कवच देण्यात आले. त्यावर काही जणांनी समाजमाध्यांमवर राजकारण सुरु केले आहे. केंद्र सरकारची योजना असल्याचे सांगितले जाते. त्याला नगरसेवक गव्हाणे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, केंद्रातील सत्तेत जरी भाजप पक्ष असला. तरी, सरकार पक्षाच्या फंडातून नव्हे तर देशातील जनतेच्या करातून गोळा झालेल्या पैशांतूनच योजना राबवित आहे. या योजनांवर देशातील प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे. केवळ सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नाही. केंद्र, राज्य सरकारच्या योजना जनतेसाठी असतात. कोणत्याही पक्षासाठी नसतात.

खासदार डॉ. अमोल कोल्हे शिरुरमधील सर्व जनतेचे देशातील संसदेच्या सभागृहात प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या पुढाकारतून भोसरीतील 1700 नागरिकांना केंद्र सरकारची योजना असलेल्या आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. 937 आरोग्य सुविधा आणि 1862 हून अधिक वैद्यकीय प्रक्रियांचे विमाकवच असलेले ओळखपत्र देण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जनतेच्या कररुपी पैशांतून राबविल्या जाणा-या योजनांचा सर्वमान्यांना लाभ मिळवून देण्यात गैर काय आहे. पण, काही काम नसलेल्यांनी यावरुनही राजकारण सुरु केले. सोशल मिडीयावर उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, असे गव्हाणे म्हणाले.

लोकप्रतिनिधीने लोकहितासाठी काम केले पाहिजे. सरकारच्या योजनांचा कर भरणा-या नागरिकांना लाभ मिळवून दिला पाहिजे. सर्वसामान्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिल्यावरही काही जणांच्या पोटात दुखते. त्यांच्या डोळ्यात खुपते. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणा-यांच्या बुद्धीची कीव येते. स्वत:ला समाजासाठी काही करता येत नसेल. तर, जो लोकहितासाठी काम करतो. त्याला नाउमेद करण्याचे काम कोणीही करु नये, असेही गव्हाणे म्हणाले. पडद्यामागील सूत्रधारांच्या सांगण्यावरुन वाटेल ते छापणा-यांनीही आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचा शेराही त्यांनी मारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.