Pune: 323 रस्त्यांच्या रुंदीकरणावरून अजित ‘दादा’ विरुद्ध चंद्रकांत ‘दादा’!

Ajit pawar against Chandrakant patil over widening of 323 roads in pune चंद्रकांत पाटील यांना सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीने विरोध केला आहे. 2019 च्या कोथरूड विधानसभा निवडणुकीत पाटील निवडूनच येऊ नये, यासाठी राष्ट्रवादीने जीव ओतून प्रयत्न केले.

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील 323 रस्ते रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-मनसेतर्फे हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली. त्यानुसार येत्या मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे. या रस्त्यांच्या प्रश्नावरून अजित ‘दादा’ विरुद्ध चंद्रकांत ‘दादा’ असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

चंद्रकांत पाटील यांना सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीने विरोध केला आहे. 2019 च्या कोथरूड विधानसभा निवडणुकीत पाटील निवडूनच येऊ नये, यासाठी राष्ट्रवादीने जीव ओतून प्रयत्न केले.

त्यासाठी आपला उमेदवार न देता मनसेचे उमेदवार ऍड. किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. तरीही पाटील निवडून आले. त्यामुळे आगामी काळात त्यांचे राजकीय वजन पुण्यात वाढू नये, यासाठी अजित पवारांनी कंबर कसल्याची चर्चा सुरू आहे.

रुंदीकरण करण्यात येणारे रस्ते प्रामुख्याने कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांतील आहेत. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरुवातीपासून आग्रही होते.

हा प्रस्ताव काही बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा असल्याचा आरोप विरोधी पक्षांतर्फे करण्यात आला आहे. तर, या प्रस्तावामुळे शहराचा विकास होणार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी, एरंडवना, प्रभात रस्ता, शिवाजीनगर या उच्चभ्रू परिसरातील हे रस्ते आहेत.

प्रशासनातर्फे हे 323 रस्ते कशाच्या आधारावर निवडल्या गेले? चुकीच्या पध्दतीने हा ठराव मंजूर केला, असा आरोप राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक विशाल तांबे यांनी केला आहे.

तर, पुणे शहराच्या विकासासाठी हा प्रस्ताव बहुमताने मान्य करण्यात आला आहे. विरोधी पक्षांना त्यासाठी वारंवार विश्वासात घेण्यात आले. त्यांचा हा विरोध राजकीय असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.