Pimpri : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अजित पवार 

सहाय्यक आयुक्तपदी सुनील वाघमारे 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (दोन) रोजगार हमी योजनेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. तर, सोलापूरचे सहाय्यक राज्यकर आयुक्त सुनील वाघमारे यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर, महापालिकेतील सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांची अमरावती आणि प्रशासन अधिकारी आशा राऊत यांची अक्कलकोट, सोलापूर येथे बदली झाली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 39 -ए मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करणे व ही पदे भरण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार पिंपरी महापालिकेत आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्तांची शासन प्रतिनियुक्तीवरील एक आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत.

महापालिकेच्या कामकाजाच्या दृष्टीने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्ताचा पदभार सह आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. निवृत्तीच्या दिवशी त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाली होती. नियमित वयोमानानुसार दिलीप गावडे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून महापालिका सेवेतील हे पद रिक्त होते. राज्य सरकारने अतिरिक्त आयुक्तपदी (दोन)रोजगार हमी योजनेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची नियुक्ती केली आहे. दोन वर्षा करिता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सोलापूरचे सहाय्यक राज्यकर आयुक्त सुनील वाघमारे यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. सह सचिव सं.श.गोखले यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे.

पिंपरी महापालिकेतील सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांची अमरावती महापालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. 1 जुलै 2017 रोजी त्यांची महापालिकेत बदली झाली होती. त्यांच्याकडे आकाशचिन्ह परवाना आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार होता. क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार प्रशासन अधिकारी सिताराम बहुरे यांच्याकडे तर आकाशचिन्ह व परवाना विभागाचा पदभार सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे सोपविला आहे.

प्रशासन अधिकारी आशा राऊत यांची सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडील क्रीडा विभाग आणि ‘ह’ क्षेत्रीय अधिकारीपदाचा पदभार सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपरी पालिकेत 11 सहाय्यक आयुक्‍त आहेत. त्यात 6 शासनाने दिलेले प्रतिनियुक्‍तीवरील आणि 5 महापालिकेचे अधिकारी आहेत.  पिंपरी पालिकेत राज्य सरकारच्या सेवेतील ‘सीईओ’ केडरचे तीन सहायक आयुक्त कार्यरत आहेत. कर संकलन विभागाचे प्रवीण अष्टीकर, भांडार विभागाचे मंगेश चितळे, नागरवस्ती विभागाच्या स्मिता झगडे कार्यरत आहेत. तर, महापालिकेतील प्रशासन अधिकारी मनोज लोणकर, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे चंद्रकांत इंदलकर, ‘अ’  प्रभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘ब’  प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, ‘क’  प्रभागाचे अण्णा बोदडे असे पाच सहायक आयुक्त  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.