Pimpri: अजितदादा जेलमध्ये जातीलच; भाजप प्रदेशाध्याक्षांचा पुनरुच्चार

एमपीसी न्यूज -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीने ठपका ठेवला आहे. त्यामुळे अजितदादा जेलमध्ये जातीलच, असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज (गुरुवारी)केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज (गुरुवारी) ते पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. आढावा बैठकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, योगेश टिळेकर, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृहनेते एकनाथ पवार, प्रदेश पदाधिकारी उमा खापरे, महिला अध्यक्ष शैला मोळक, राजेश पिल्ले उपस्थित होते.

निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर 3 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या ‘अटल संकल्प महासंमेलनात’ बोलताना रावसाहेब दानवे यांनी ‘अजितदादांनी सिंचन घोटाळा केला आहे. त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल’ असे सांगत राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्याची जोरदार चर्चा झाली होती.

त्यानंतर आज शहरात आलेल्या रावसाहेब दानवे यांना अजित पवार यांच्या अटकेबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, मी 3 नोव्हेंबरच्या निगडीतील सभेत बोलल्यानंतर दोन दिवसांनी  अजित पवार यांच्यावर ताशेरे ओढले. सरकारनेही बंद पाकीटातून न्यायालयात अहवाल सादर केला. त्यामुळे अजित पवार जेलमध्ये जातीलच, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केले. कधी जातील याबाबत विचारले असता त्यांनी स्मितहास्य करत मौन बाळगणे पसंत केले.

दरम्यान, राज्यातील डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविली आहे. राज्यातील डान्सबार बंद झाले पाहिजेत. डान्सबार बंद असावेत हीच भाजपची भुमिका आहे. न्यायालयाचा निर्णय आपण वाचला नाही. निर्णय नेमका काय आहे, ते वाचून सरकार पुढचे पाऊल उचलेल, असेही दानवे यांनी सांगितले. तसेच डोंबलीतीली भाजप पदाधिका-याकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्याबाबत विचारले असता त्यांनी त्यावर सोयिस्कररित्या बोलणे टाळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.