Satara News : क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जाऊन अजित पवारांनी वाहिली आदरांजली

एमपीसी न्यूज – ‘क्रांतिज्योति सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्तीक्रांतिज्योति सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव या जन्मगावी जाऊन आदरांजली वाहिली. सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगाव ता.खंडाळा, जि.सातारा येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी उपुख्यमंत्री बोलत होते. क्रांतिज्योति सावित्रीबाई यांचा जन्मदिन राज्य शासनातर्फे ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो. राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्याही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रीयांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली.

स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघांनी केलेलं कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहतील. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचं श्रेय क्रांतिज्योति सावित्रीबाईंनी त्याकाळात स्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. जयंतीदिनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुलें यांना विनम्र अभिवादन.

नायगाव येथे आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री बाळासाहेब पाटील,खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले ,उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले,प्रांतधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दशरथ काळे ,नायगावाच्या सरपंच पूनम नेवसे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.