Pune : ‘आपण पुणेकर, मुंबईतील ‘नाईट लाईफ’वर अजित पवारांचे उत्तर

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी – चिंचवडमधून प्रस्ताव आला तर या ठिकाणीही ‘नाईट लाईफ’ सुरू करता येईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास पुणेरी पाट्यांमध्ये उत्तर देत आपण ‘पुणेकर आहोत, मुंबईचं जीवन वेगळं असून, २४ तास मुंबई जागी असते. त्यातून काय अनुभव येतो, ते पाहू. पुणेकरांना मान्य होईल, असा निर्णय घेऊ, असेही पवार यांनी सांगितले.

पोलिओ लसीकरण मोहीम कार्यक्रमा दरम्यान अजित पवार उरो रुग्णालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबईचं लाईफ वेगळं आहे. मुंबई कधी झोपत नाही, असं नेहमी बोललं जातं. ती २४ तास जागी असते, हे अनेकदा ऐकलं आहे. मुंबईबद्दल तसा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचा अनुभव काय येतो, हे पाहुया. जर काही निष्पन्न झाले, तर पुढचा विचार करू. लगेच इकडं सुरू झालं की, इकडे सुरू करा, असं नसतं.

दरम्यान, साई जन्मस्थान वादामुळे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी बैठक बोलावलेली आहे. पाथरी आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचं कारण नाही. मी सुद्धा साई भक्तांना आवाहन करतो की, यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.