Mumbai News : एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा 

एमपीसी न्यूज – एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरण्याची घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार एमपीएससी बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला.

यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘मला विरोधकांसह राज्यातील जनतेला सांगायचं की, स्वप्निल लोणकर याने 2019 मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. परीक्षेचा निकाल 28 जुलै 2020 रोजी लागला. या परीक्षेत 3 हजार 671 उमेदवार पात्र ठरले. 1,200 पदांसाठी ही परीक्षा झाली होती. दरम्यान, एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत. याच दरम्यान, कोविडची साथ आली. यात एमपीएससी आयोगाला स्वायत्तता दिलेली असल्याने आयोगाने परीक्षा रद्द केल्या.

‘मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क केला. स्वायत्तता दिलेली असली, तरी अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितलं,’ असं अजित पवार यांनी सभागृहात बोलताना सांगितलं.

‘काल झालेल्या बैठकीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. या विषयावर सर्वांनीच भूमिका मांडली. सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतलेली आहे. आज सभागृहात सांगू इच्छितो की, सरकार 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही,’ अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.