Pimpri : ‘पालकमंत्री फिरकत नाहीत, शहराला कोण वाली नाही, आयुक्त हतबल’

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष आहे. पालकमंत्री शहरात फिरकत नाहीत. पिंपरी-चिंचवडला कोणी वालीच राहीला नाही. तर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हतबल झाले आहेत, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी केला. तसेच लाल दिवा, महामंडळासाठी एकडून तिकडे उड्या मारणा-या बेडकांना भाजपने अद्यापही काहीच दिले नाही. केवळ गाजर दाखविले. आत्ता केवळ सहा महिन्याचा कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. असे देखील ते म्हणाले 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पुढाकाराने आज (शनिवारी) रहाटणीत कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पवार शहरात आले आहेत. तत्पुर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ, श्याम लांडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत सत्ता असताना आम्ही सर्वांना सोबत घेऊन शहरहिताचे काम करत होतो. पदाधिकारी आणि आयुक्तांमध्ये समन्वय साधण्याचे काम मी करत होतो. केंद्रातील प्रश्नांची सोडवणूक पवारसाहेब करत होते. आता मात्र पालकमंत्री शहरात फिरकत नाहीत. कोणाचेच शहराकडे लक्ष नाही. आयुक्त हतबल झाले आहेत. आमदार, खासदार शहरविकासाकडे नव्हे तर स्वहिताकडे लक्ष देतात. विकास कामाच्या निविदांमध्ये ‘रिंग’ करतात.

रेडझोन, कचरा, पाणी, महागाई, दुष्काळ सर्व आघाड्यांवर सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप करत पवार म्हणाले, पीएमआरडीएचे कार्यालय पुण्यात नेले. शहराला लागून असलेल्या उपनगरातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी पुण्यात जावे लागत आहे. आम्ही नागरिकांना कधीच त्रास दिला नाही. भाजपने विस्कटण्याचे काम केले आहे. कच-यात रिंग झाल्याचे स्वपक्षिय खासदार सांगत आहे. पैसे खाण्यासाठी दोन भाग केले आहेत. नगरसवेक तसेच लाल दिवा, महामंडळासाठी एकडून तिकडे उड्या मारणा-या बेडकांना भाजपने अद्यापही काहीच दिले नाही. केवळ गाजर दाखविले, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.