Pimpri : अटलजींच्या जाण्याने अजातशत्रु नेतृत्व हरपले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची खंत.

एमपीसी न्यूज –  देशाच्या राजकारणात,शैक्षणिक क्षेत्रात,व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अटलजींनी नेहमीच उल्लेखनिय कामगिरी बजावली. अत्युच्च पदावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कधीही बदल झाला नाही. एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून अटलजींनी आपली तत्त्वे आयुष्यभर जोपासली आणि त्यांच्या या गुणांमुळेच ते कायम समाजाभिमुख राहिले आहेत.त्यांच्या अकाली जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले असून,त्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे,अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी व्यक्त केली आहे.
बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक अजातशत्रु नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्‍तृत्‍वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतिक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता प्रधानमंत्री असे बहुआयामी व्यक्‍तीमत्‍व असलेल्‍या अटलजींच्‍या जाण्‍याने एका ध्‍यासपर्वाची अखेर झाली आहे, तत्वनिष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. स्वत:च्या विशीष्ट कार्यशैलीने राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून अवघ्या भारत देशाच्या विकास प्रक्रीयेत त्यांच्या महत्वाचा वाटा आहे.अष्टपैलू,सर्वसमावेशक व्यक्तिमत्व,मवाळ चेहरा, अभ्यासू प्रतिमा,धडाडी वृत्ती हि अटलजींची उल्लेखनिय बाजू आहे.भारतीय राजकारणात, समाजकारणात दीर्घकाळ आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला पण तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.त्यांनी केलेले कार्य,त्यांची स्मृती राज्याला सतत प्रेरणादायी ठरेल.असे बच्छाव यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.