Ajooni Movie : ‘अजुनी’चे पोस्टर रिलीज

एमपीसी न्यूज – मराठी चित्रपट क्षेत्रात नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट येतात. ती परंपरा आजही कायम आहे. सशक्त विषय, उत्तम मांडणी, दर्जेदार अभिनयाने सजलेल्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळते. अशाच एका नव्या विषयावरील चित्रपट घेऊन दिग्दर्शक साकार राऊत येत आहे. त्यात अभिनेता पीयूष रानडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘संघर्ष यात्रा’, ‘शिव्या’ अशा उत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले साकार राऊत आणि पीयूष रानडे यांचा ‘अजुनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर लक्षवेधी ठरत आहे. मावळतीचा सूर्याच्या तेजानं उजळलेलं नभांगण आणि त्यात उभा असलेला तरुण असं अर्थपूर्ण हे पोस्टर आहे. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेच्या अनेक शक्यतांचा अंदाज बांधता येऊ शकतो.

अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन प्रा.लि. निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच साकार राऊत यांनी निर्मितीचीही जबाबदारीही स्वीकारली आहे. सध्या या चित्रपटात पीयूष रानडे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीदेखील अद्याप अन्य भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आलेला नाही. त्यामुळे पीयूषसोबत या चित्रपटात नेमकी कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.