‘अकस’ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा…

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- अभिनेता अंशुमन विचारे यांच्या ऍक्टिंग अकॅडमीतर्फे ‘अकस’ सामाजिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सामान्य व्यक्तींमधील असामान्य कर्तृत्वाचा गौरव करावा, त्यांचे कार्य समाजासमोर आणावे; तसेच त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना सतत ऊर्जा मिळत राहावी या हेतूने ‘अकस’ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. ‘अकस पुरस्कार 2019’, म्हणजेच असामान्य कर्तृत्वाला सलाम (अकस) या नावाने या पुरस्कारांना ओळखले जाणार आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अंशुमन विचारे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

सर्वसामान्य माणसांकडून कळत नकळत किंवा ठरवून समाजसेवा घडत असते. त्यांच्या कर्तृत्वाला या पुरस्कारांच्या माध्यमातून सलाम करण्यात येणार आहे. रोख रक्कम ११ हजार, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे हे पहिले वर्ष असून, यंदा एकूण ६ पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी आयोजकांनी समाजाच्या सर्व स्तरांतून निवेदने मागविली आहेत.

आयोजकांना प्राप्त होणाऱ्या निवेदनांतून निवड समिती योग्य त्या व्यक्तींची निवड करणार आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्या व व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार या ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. स्वतः अंशुमन विचारे यांच्यासह राजेंद्र पवार, दीपक गोडबोले, संतोषी पवार अशा कार्यकर्त्यांचे बळ या पुरस्कार संकल्पनेमागे आहे. पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारी 2019 मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या पुरस्कारांसाठी निवेदने स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2019 आहे. निवेदने लेखी अर्जाद्वारे; तसेच ‘इमेल’द्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. निवेदनाच्या प्रवेशिका अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमीच्या कार्यालयातही उपलब्ध आहेत. निवेदने पत्राद्वारे पाठवायची असल्यास खालील पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पत्ता : अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमी, पुष्पकधाम सोसायटी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, बेतुरकर पाडा, कल्याण (पश्चिम) – 421301
इमेल : [email protected]
अधिक माहितीसाठी संपर्क : 8369510046 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.