Akshay v/s Bear Grylls: आता रंगणार ‘खिलाडी’ अक्षय व्हर्सेस ‘वाइल्ड स्टार’ बेअर ग्रिल्सचा सामना

कर्नाटकातील बांदीपूर अभयारण्यात शूट झालेल्या या कार्यक्रमात दिलखुलास आणि बिनधास्त अक्षयचे दर्शन होणार आहे.

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपटातील नायकाप्रमाणे ख-या आयुष्यात देखील ‘रफ अँड टफ’ असणारा सुपरस्टार म्हणजे आपला खिलाडी अक्षयकुमार. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आणि प्रचंड लोकप्रियता मिळून देखील त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अक्षय नेहमी आपल्या आश्चर्यचकित करणा-या कारनाम्यांमुळे चर्चेत असतो. सुरुवातीच्या काळात पिक्चरमध्ये तो स्वत:चे फाइट सीन स्वत:च करत असे. त्यामुळे त्याला साहसाची आवड आहे.

म्हणूनच बॉलिवूडचा हा खिलाडी लवकरच ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड स्टार’ बेअर ग्रिल्ससोबत एका नवीन शोमध्ये दिसणार आहे. डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होणा-या या कार्यक्रमाचे नाव आहे ‘इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’. अक्षयने ट्विटरवरुन ही माहिती असून त्याने या शोचा प्रोमोदेखील शेअर केला आहे.

अक्षयनेही प्रोमो शेअर करताना या शो मधील एक धक्का देणारी गोष्टदेखील सांगितली आहे. ‘मी यापूर्वी बर्‍याच आव्हानांची कल्पना केली होती. पण हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेल्या चहाने बेअर ग्रेल्सने मला चकित केले’, असे अक्षय म्हणाला.

अक्षय आणि बेअर यांच्या अ‍ॅडव्हेंचरने परिपूर्ण असा हा कार्यक्रम येत्या 11 आणि 14 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता हा प्रसारित होणार आहे. यात अक्षयने हा चहा प्यायला की नाही याचे सिक्रेट ओपन होईल.

कर्नाटकातील बांदीपूर अभयारण्यात शूट झालेल्या या कार्यक्रमात दिलखुलास आणि बिनधास्त अक्षयचे दर्शन होणार आहे. या प्रोमोत अक्षय बेअर ग्रिल्स सोबत जंगलात फिरताना आणि स्टंट करताना दिसत आहे. हा कार्यक्रम हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये भारतासह जपान, चीन, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशियासह 50 देशांमध्ये प्रसारित होणार आहे.

याआधी बेअर ग्रिल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेत जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये भटकंती केली होती. तसेच सुपरस्टार रजनीकांतने देखील काही दिवसांपूर्वी बेअर ग्रिल्ससोबत बांदीपूरच्या जंगलात अशाच प्रकारचा एक साहसी शो केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.