Akurdi: …अन् तहसीलदार कार्यालयाबाहेर पाससाठी गेलेल्या नागरिकांची झाली निराशा

एमपीसी न्यूज – परगावी जाण्यासाठी नागरिकांना राज्य सरकारने शुक्रवारी पास देण्याची घोषणा केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील परगावी आणि दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी इच्छूक असलेल्या नागरिकांनी पास घेण्यासाठी आज (शनिवारी) आकुर्डीतील अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. मात्र, तहसील कार्यालयातून पास देण्यात येत नसल्याने नागरिकांची निराशा झाली.

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तर, राज्य सरकारने शुक्रवारी परगावी अथवा परराज्यात जावू इच्छिणार्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पास देण्याची घोषणा केली.

यामुळे महाराष्ट्रातील काही भागातील नागरिक आप-आपल्या गावी जावू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी आकुर्डीतील अप्पर पिंपरी चिंचवड   तहसील कार्यालयाबाहेर पास घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दी वाढत असल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, अपर तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर तहसिलदार गितांजली गायकवाड यांनी परजिल्ह्यातील आणि परराज्यातील नागरिकांना जाण्यासाठी पुणे जिल्हाधिकार्‍यांचा कोणताही लेखी आदेश कार्यालयाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पाससाठी गेटवर गर्दी करू नये, असा फलक लावला आहे. कार्यालयातून पास देण्यात येत नसल्याने नागरिकांची निराशा झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.