Akurdi Crime News : पिस्तूल घेऊन व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत हिरोगीरी करणं पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – हातात विनापरवाना पिस्तूल घेऊन व्हिडिओ बनवून तो व्हाट्सअपवर स्टेटस ला ठेवत हिरोगीरी करणं दोघांना चांगलंच महागात पडलं आहे. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. 27) दुपारी साडेपाच वाजता विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर आकुर्डी येथे करण्यात आली.

आरशान शाकीर शेख (वय 25), उमेर जाकीर शेख (वय 21, दोघे रा. दत्तवाडी आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई रामदास मोहिते यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगून ते हातात घेऊन हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या संगीतावर व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ आणि पिस्तुल घेऊन काढलेले फोटो आरोपींनी व्हाट्सअपच्या स्टेटस वर ठेवले. या स्टेटसची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी तात्काळ या हिरोगीरी करणाऱ्यांची माहिती काढली. त्यांच्या घराच्या परिसरातून मंगळवारी दुपारी साडेपाच वाजता विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर आकुर्डी येथून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक दुचाकी (एम एच 12 / जी डब्ल्यू 6224) आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल असा एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.