Akurdi crime News : आकुर्डी परिसरात खुनी हल्ल्याच्या दोन घटना; पाच जखमी

0

एमपीसी न्यूज – आकुर्डी परिसरात बुधवारी (दि. 17) रात्री खुनी हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत एक तर दुसऱ्या घटनेत चारजण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत गुरुवारी निगडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खुनी हल्ल्याची पहिली घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता आकुर्डी येथील पांढरकर सभागृहाच्या आवारात घडली. साहिल उर्फ खा-या तानाजी जगताप (वय 22, रा. बौद्धनगर, आकुर्डी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार बॉबी उर्फ सुरेश यादव (वय 30), विक्की उर्फ कांचा वाघ (वय 22), सनी सरपट्टा (वय 26), गुंड्या सरपट्टा (वय 25), प्रसाद उर्फ लंब्या सुतार (वय 27), कल्पेश (पूर्ण नाव माहिती नाही, वय 20), जिग्नेश सावंत (वय 27, सर्व रा. आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी साहिल यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून सिमेंटचा गट्टू, लथाबुक्क्यांनी मारहाण करून साहिलला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

_MPC_DIR_MPU_II

यात साहिल गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात निलावती शिवशंकर माळी (वय 50, रा. भालेराव निवास समोर, भाऊ पाटील चाळ, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. निलावती, त्यांची मुलगी, मुलगा आणि शेजारी राहणारा ओंकार (पूर्ण नाव माहिती नाही) हे चारजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजता भाऊ पाटील चाळ, आकुर्डी येथे घडली.

निलावती यांच्या फिर्यादीनुसार, खा-या जगताप, बाबू सुर्वे, शंकर दाते, नितीन सोनवणे, कृष्णा इटकर, सलम्या खान, आबू शेख, सोया रट्टे, सनी तलवार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी निलावती, त्यांची मुलगी, मुलगा आणि शेजारी राहणारा ओंकार या चौघांवर आरोपींनी आपसात संगनमत करून कोयत्याने वार केले. लाकडी दांडक्याने , दगड, विटाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरात दहशत पसरवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.