Akurdi : सातबारा फेरफार मशीन चालू करण्याची तहसीलदारांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार ‘क्युऑस’ मशीन मागील 11 महिन्यांपासून बंद आहे. नगरसेवकांनी मशीन चालू करण्याची मागणी सातत्याने केल्यानंतर आता तहसीलदारांनी ‘क्युऑस’ मशीन चालू करण्याची मागणी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना पत्र पाठविले आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, नगरसेविका प्रियंका बारसे, नगरसेवक संजय वाबळे, दिनेश यादव यांनी मशीन चालू करण्याची मागणी केली होती. मशीन बंद असल्यामुळे नागरिकांना फेरफार काढण्यासाठी खडकमाळ येथील तहसील कार्यालयात जावे लागते. त्यात नागरिकांच्या वेळेचा मोठा अपव्यय होत असल्याने आकुर्डीतील तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार ‘क्युऑस’ मशीन चालू करण्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून केला जात होता. त्यानंतर आता तहसीलदारांनी जिल्हाधिका-यांना पत्र पाठवून मशीन चालू करण्याची मागणी केली आहे.

आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालय क्षेत्रात 30 महसुली गावाची सन 1930 ते 2010 या कालावधीतील स्कॅनिंग केलेल्या सातबारा उतारे व फेरफार उतारे शेतक-यांना सत्यप्रति देण्यासाठी ‘क्युऑस’ मशीन बसविण्यात आली आहे. प्रदीप कुंभार ही मशीन चालवित होते. शेतक-यांना सातबारा, फेरफार नकला देण्यात येत होत्या. कुंभार यांच्याकडे कार्यारंभ आदेश नसल्यामुळे 26 एप्रिल 2019 पासून मशीन बंद करुन त्यांच्या ताब्यात दिली आहे.

त्यानंतर कुंभार यांनी क्युऑस मशीन चालू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. मशीन बंद असल्यामुळे अभिलेख कक्षात नक्कल मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतात. या अर्जाची निर्गत होण्यासाठी पारंपारिक पद्धतीने अभिलेखाचा शोध घेणे. त्याची फी आकारणी नागरिकांच्या तक्रारीचे निरासन करणे. अचुकपणे नागरिकांच्या अभिलेखाची मागणी नोंद करणे. या कामाचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे ही प्रक्रिया सुलभ व्हावी. नागरिकांना तात्काळ अभिलेख उपलब्ध करुन देता द्यावेत.

पिंपरी-चिंचवड शहरी भाग असल्याने नागरिकांना कोर्टाच्या कामासाठी, अपील केससाठी नक्कल लागत आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मशीन बंद असल्यामुळे अर्जदार कार्यालयात येऊन वाद घालतात. त्यामुळे प्रदीप कुंभार यांना तहसील कार्यालयात क्युऑस मशीन बसवून सातबारा उतारे, फेरफार उतारे नक्कल देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती तहसीलदार गीतांजली गायकवाड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.