Akurdi: डेंग्यू, चिकुनगुन्याबाबत आकुर्डीत जनजागृती रॅली

एमपीसी न्यूज – डेंग्यू, चिकुनगुन्या आणि साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयातर्फे आज (शनिवारी) परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत आकुर्डीतील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅलीमध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, शाळेच्या मुख्याध्यापिका मोमीन मॅडम, परिचारिका सोमण स्मिता गोरक्ष करपे , संदीप जगताप,राजेश निकम, अविनाश राठोड, शैलेश वाघमारे, विठ्ठल जाधव , शिवाजी कर्डीले, अंकुश मुंडे, स्वाती आल्हाट, शैला साबळे, राजश्री विनरकर, मंदा लोखंडे, शीतल खांडेकर, राजेश निकम, अविनाश राठोड यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

मौलामा अब्दुल कलाम आझाद उर्दु शाळेपासून जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. विवेकनगर, विठ्ठलवाडी, आकुर्डी गावठाण, तळजाई वस्ती, आकुर्डी दवाखाना परिसर, पंचतारानगर, खंडोबा माळ या परिसरात रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. ‘स्वच्छता पाळा, रोगराई टाळा’, ‘डंख छोटा, धोका मोठा’ अशा जनजागृतीपर घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.

मार्गदर्शन करताना डॉ. सुनीता साळवे म्हणाल्या, ”वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल व सदोष जलव्यवस्थापन यामुळे डासांच्या उत्पत्तीचा वेग वाढतो. डेग्यू ताप व चिकनगुन्या ताप विषाणूंमुळे होतो. डेंग्यू तापाचा व चिकुनगुन्या तापाचा प्रसार एडिस एजिप्ता नावाच्या डासामार्फत होतो. हे डास दिवसा चावतात. घरामध्ये अंधा-या जागी हे डास बसतात. साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये”.

”पाणी साठ्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करुन घासून, पुसून कोरडी करुन पुन्हा वापरावीत. तीव्र ताप, डोकेदुखीस स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाल कोरड पडणे ही डेंग्यूच्या तापाची लक्षणे आहेत. लक्षणे आढळल्यास पालिकेचा दवाखाना, रुग्णालयामध्ये तपासणी करुन घ्यावी” असे आवाहनही डॉ. साळवे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.