Akurdi : उर्दू माध्यमिक विद्यालयातील 350 विद्यार्थ्यांनी घेतला कार्यशाळेचा लाभ

एमपीसी न्यूज – ‘बीना एज्युकेशन ट्रस्ट’तर्फे पिंपरी चिंचवड परिसरातील उर्दू माध्यमिक शाळांमधील 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे, नगरसेवक जावेद शेख, बीना इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक समिना मौमीन गुलाम शेख, मौलाना अब्दुल गफार, गुलजार हाजी, शौकत खान, मौलाना नसीम फैजी, लतिफ खान, अझहर पुणेकर, आकमल खान, अब्दुला खान आदी उपस्थित होते.

यावेळी शैक्षणिक समुपदेश प्रल्हाद देशपांडे व सय्यद सईद अहमद यांनी एस. एस. सी बोर्डच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा तीन सत्रामध्ये पार पडली. पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतची भीती दूर होऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच नवीन अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप त्या प्रश्नपत्रिकेतील गुणांची विभागणी आणि गुणांची टक्केवारी वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

दुस-या सत्रामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये अध्यापनासाठी माहिती, शिक्षणातील मानसशास्त्र, प्रभावी संवाद कौशल्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तिसरे सत्र पालकांसाठी होते. यामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांच्या समस्या समजून घ्याव्यात तसेच त्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून प्रयत्नशील राहावे व त्यांना पूरक वातावरण निर्माण करुन द्यावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचा बीना इंग्लिश स्कुल व महानगरपालिकेच्या सात शाळांच्या एकूण 350 विद्यार्थी तसेच शिक्षक व पालकांनी लाभ घेतला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बीना एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष इकबाल खान म्हणाले, “आपल्याला समाजात उच्च स्थान मिळवायचे असेल, स्वतःची प्रगती करायची असेल तर शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. चांगले शिक्षण घेऊन आपण स्वतःचेच नाव नाही, तर आपल्या पालकांचे, शिक्षकांचे व शाळेचे नाव मोठे करु शकतो. म्हणून शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे”. कार्यक्रमाचे आयोजन सलाम इनामदार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.