Akurdi: नाट्यगृहाच्या कामात वाढीव खर्चाच्या नावाने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – आकुर्डी प्राधिकरणातील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे कामातील वाढीव खर्चाच्या नावाने भ्रष्टाचार केला जात आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, आकुर्डी प्राधिकरणातील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे निविदा 37 कोटी 25 लाखांची होती. या कामाचा कालावधी साडे चार वर्षाचा होता. निविदा प्रक्रिया राबवुन यासाठी एम. आर. गंगाणी ब्रदर्स या ठेकेदाराला काम दिले गेले. त्यानंतर कार्यारंभ आदेश 11 नोव्हेंबर 2014 ला दिला. तरी, काम पूर्ण झाले नाही. गेल्या चार वर्षापासून संथ गतीने हे काम सुरू आहे. काम वेळेत न करणा-या ठेकेदारावर सत्ताधारी मेहरबान झाल्याचे दिसून आले. एका प्रकल्पावर आजवर पाच अभियंते नियुक्त केले गेले मात्र काम वेळेत पुर्ण झाले नाही. या कामास 10 नोव्हेंबर 2017 पर्यंत मुदत होती. मात्र, ठेकेदारांच्या संथ गती कामामुळे काम रेंगाळले आहे.

महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई न करता वारंवार मुदतवाढ दिली. मुदत या महिना अखेरीस पूर्ण होत असतानाही प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन आणि स्थायी समितीने मेहरबान होत वाढीव खर्चाला मान्यता दिली आहे. 22 कोटी 89 लाख वाढीव खर्च महापालिकेच्या स्थायी समितीने व प्रशासनाने नुकताच मंजूर केले आहे. विरोधात असताना भाजप-शिवसेना वाढीव खर्चाला कडाडून विरोध करत होते. आता त्याचा त्यांना विसर पडला आहे, असेही भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.