Akurdi : ‘आकुर्डी येथील महापालिका रुग्णालयाचे ‘कार्यसम्राट नगरसेवक स्वर्गीय जावेद शेख रूग्णालय’ असे नामकरण करा’

एमपीसीन्यूज : दत्तवाडी – आकुर्डी प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक स्वर्गीय जावेद शेख यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. शेख यांच्यामुळे आकुर्डी प्रभागाचा कायापालट झाला आहे. विकासपुरूष अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात तसेच भावी पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, यासाठी महापालिकेच्या आकुर्डी येथील नवीन भव्य रुग्णालयाचे ”कार्यसम्राट नगरसेवक स्वर्गीय जावेद शेख रूग्णालय” असे नामकरण करावे, अशी मागणी शिवसेना पिंपरी चिंचवड कार्यालयप्रमुख व रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने केली आहे.

याबाबत सुतार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर माई ढोरे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन दिले आहे. आपुलकी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कुऱ्हाडे, सरचिटणीस प्रकाश परदेशी, खिदमत ए आवामचे अध्यक्ष सोहेल मोमीन, वसीम सय्यद, आकुर्डी- प्राधिकरण मुस्लिम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सलीम मोमीन यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, जावेद शेख हे गेली 15 वर्ष या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करीत होते. पहिल्यांदा नगरसेवक झाल्यापासून त्यांनी वॉर्डाचा कायापालट केला. वॉर्डातील जनतेसाठी ते 24 तास उपलब्ध असत. जनसामान्यांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचे प्रश्न सोडविण्याची हातोटी असल्याने ते जनतेच्या गळ्यातील ताईत होते.

वॉर्डातील स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न सोडविण्यास ते कायम अग्रेसर होते. ज्येष्ठ नागरीक, महिला, मुली तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्याशिवाय ते स्वस्त बसत नव्हते. त्यामुळे प्रत्येकाला ते आपल्या कुटूंबातील सदस्य वाटत होते, नव्हे ते प्रत्येकाचा आधारवड होते.

गेल्या 15 वर्षात त्यांनी दत्तवाडी-आकुर्डी प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे. ते कार्यसम्राट नगरसेवक होते. मात्र, कोरोनाच्या महामारीत त्यांचे अकाली निधन झाले. कोरोनाचा पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव झाल्यावर त्यांनी ’कोरोना योध्दा’ बनून प्रभागातील जनतेला सर्वप्रकारची मदत केली. अशा या कोरोना योद्धयाचा अखेर कोरोनाने बळी घेतला.

जनतेच्या मनात त्यांचे स्थान कायम अढळ राहिलच. त्याचबरोबर त्यांच्या स्मृती कायम रहाव्यात यासाठी आकुर्डी येथे महापालिकेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या आकुर्डी रूग्णालयाला “कार्यसम्राट नगरसेवक स्वर्गीय जावेद शेख रूग्णालय ” असे नामकरण करावे, ही दत्तवाडी आकुर्डी प्रभागातील जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनांचा विचार करून या मागणीची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे सुतार यांनी निवेदनात म्हटले आहे.

नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या कार्याच्या जोरावर घरारात स्थान मिळविले होते. त्यांचे अकाली निधन होणे ही मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आकुर्डी प्रभागातील संस्था आणि संघटनच्यावतीने बशीर सुतार यांनीआकुर्डी रूग्णालयाला “कार्यसम्राट नगरसेवक स्वर्गीय जावेद शेख रूग्णालय ” असे नामकरण करावे, अशी मागणी केली आहे. याबाबतचा ठराव प्रभाग स्तरावर मंजूर होणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास मीही स्वतः शक्य ते सहकार्य करेन.

माई ढोरे-महापौर, पिंपरी चिंचवड.

आकुर्डी येथील महापालिकेच्या रुग्णालयाला नगरसेवक सेवर्गीय जावेद शेख यांचे नाव देण्याची मागणी काही संघटना आणि स्थानिक जनतेने केली आहे. ही मागणी रास्त आहे. यावर महापालिका योग्य निर्णय घेईलच. जावेद शेख यांच्या समाजकार्याला न्याय देण्यासाठी आपण पाठपुरावा करु. यासाठी लागणारे सहकार्य देखील केले जाईल. श्रीरंग बारणे – खासदार, मावळ लोकसभा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.