Akurdi : आधुनिक पद्धतीने उत्पादन आणि सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव

एसबीपीआयएममध्ये सातवी राष्ट्रीय परिषद संपन्न

एमपीसी न्यूज – सध्याच्या काळामध्ये सर्वच व्यवसाय तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादने आणि सेवा कमीत कमी किंमतीमध्ये देण्यासाठी प्रयत्नशील असतात. यासाठी दिलेल्या वेळेमध्ये उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधनांचे योग्य व्यवस्थापन, आधुनिक पद्धतीने जलद उत्पादन आणि सेवांच्या नवनवीन संधी निर्माण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन बेंगलोरच्या प्रिन्सिपल वेलिंगकर संस्थेचे संचालक डॉ. अनिल राव यांनी केले.

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने ‘21 व्या शतकातील नवनिर्माणच्या संधी आणि संसाधनाचे व्यवस्थापन’ या विषयावर दोन दिवसीय 7व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बेंगलोरच्या उद्योजक महेंद्र यादव, पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनियल पेणकर, डॉ. हंसराज थोरात, डॉ. कीर्ती धरवाडकर आदी उपस्थित होते.

यावेळी उद्योजक महेंद्र यादव म्हणाले, संसाधनांचे व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ, कच्च्या मालाचा पुरवठा, आधुनिक यंत्रसामुग्री, उच्च तंत्रज्ञान, अल्प व्याजात मुबलक अर्थपुरवठा यांचे योग्य व्यवस्थापन करणे होय. संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये नियोजन आणि अंदाजपत्रक महत्वाचे असते.

त्यानंतर एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनियल पेणकर म्हणाले, योग्य व्यवस्थापनाव्दारे मनुष्यबळ विकसित करून नवनिर्मिती करणे होय. काळानुसार उद्योग व्यवसायामध्ये करावयाचे बदल, कामाच्या वेळेची लवचिकता, विक्री पश्चात सेवा, नवनिर्मिती आणि क्रियाशीलता याचे योग्य व्यवस्थापन करून आगामी काळात उद्योजकतेच्या आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. त्यातूनच उद्योगांचे अस्तित्व दीर्घकाळ टिकू शकेल आणि देशाची प्रगती वेगाने होईल, असा आशावाद डॉ. पेणकर यांनी व्यक्त केला.

डॉ. वर्षा बोरगावकर यांनी परिषदेत देशभरातून आलेल्या 43 लेखांचे आणि शोध निबंधाचे मूल्यमापन केले. या परिषदेत देशभरातून 60 महाविद्यालयातून 150 विद्यार्थी, स्वयंसेवक, प्राध्यापक, संशोधक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. परिषदेच्या आयोजन पीसीईटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या सहकार्याने करण्यात आले.

सूत्रसंचालन डॉ. स्वप्नाली कुलकर्णी यांनी केले., कार्यक्रमाचे आभार डॉ. अनुराधा फडणीस आणि डॉ. हंसराज थोरात यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.