Akurdi News: शासनाच्या आरोग्य योजना गरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्यदूत व्हा – डॉ. किशोर खिल्लारे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध उपचार, शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण, माता बालसंगोपन इत्यादी आरोग्य योजना गरीबापर्यंत पोहोचवण्याचे काम जन चळवळीतील कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण (YCM) वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. किशोर खिल्लारे यांनी आकुर्डी येथील कार्यक्रमात केले.

डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी वाय एफ आय) जनवादी महिला संघटना पिंपरी-चिंचवड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यान आयोजित केले होते. गणेश दराडे, अपर्णा दराडे, सलीम सय्यद, सतीश नायर, शेहनाज शेख, दिलीप पेटकर, ख्वाजा जमखाने, सुषमा इंगोले, नूरजहान जमखाने, वीरभद्र स्वामी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची एकूण सात रुग्णालये व एक सुपर स्पेशालिटी शैक्षणिक रुग्णालय आहेत. या रुग्णालयात नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणीसह विविध आजारांवर चांगले उपचार केले जातात.

अशक्तपणा, ऍनिमिया, ताप, सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, पित्त, वात, तथा साथीचे आजार, बालकांचे व गरोदर स्त्रियांचे लसीकरण, अपंग, व्याधिग्रस्त ज्येष्ठ नागरिक, दमा, उच्च रक्तदाब, मधुमेह, गुडघे, कंबर दुःखी शस्त्रक्रिया यासारख्या बहुसंख्य आजारावर अत्यल्प दरात उपचार केले जातात. महागड्या औषधी गोळ्या, टॉनिक अत्यल्प दरात दिले जाते. महाराष्ट्र राज्यात पिंपरी चिंचवड मनपाच्या आरोग्य विभागाचे काम चांगले आहे.

त्यामुळे पदव्यूत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पुणे जिल्हा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, शेतकरी, शेतमजूर व त्यांचे नातेवाईक येथे उपचारासाठी येतात. आयसीयुमध्ये ‌अत्यंत गंभीर रूग्णावर उपचार केले जातात.

तज्ज्ञ अध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिकारी, परिचरिका तसेच सार्वजनिक – खाजगी भागीदारीत सिटी स्कॅन, एम आर आय व हृदयविकार उपचार सुविधा मनपाकडे उपलब्ध आहेत. जनआरोग्य योजनांची माहिती वस्ती पातळीवर पोचवा,असे आवाहन डॉ. किशोर खिल्लारे यांनी केले आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री मातृवंदना व जननी सुरक्षा योजनांची माहिती या विषयावर व्याख्यान देताना ते म्हणाले की, दुर्धर आजारासाठी राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य, केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना आहे. नेत्र, अस्थी, पोट, जठर, मज्जातंतू, ह्रदय, मेंदू विकार, त्वचा, चर्म, कँसर, लिव्हर ई अतिशय महागड्या शस्त्रक्रिया उपचारासाठी खर्च येत नाही. शहरातील काही नामवंत खाजगी रुग्णालयामध्ये देखील महात्मा फुले जीवनदायी, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना मार्फत उपचार होतात. मनपाच्या सर्व सेवा याची माहिती चळवळीतील कार्यकर्त्यानी संकलित करावी. आणि गरजूना ती उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य दूत व्हावे असे सांगत डॉ.किशोर खिल्लारे म्हणाले, विविध रोग्यचिकित्सा आरोग्य शिबीर कोवीड नियमांचे पालन करून आयोजित करावे.

महापालिकेच्या पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य विभागाने कोरोना महामारी काळात सुरू केलेले अभियान सर्वसामान्य जनतेला अतिशय आशा देणारे ठरले आहे. प्रशासकीय सहकार्यातून आरोग्य समृद्धीचा सेतू उभारण्यासाठी कार्यकर्त्यानी तळमळीने काम करावे असेही डॉ. खिल्लारे यांनी सांगितले.

अमिन शेख, स्वप्निल जेवळे, जय डोळस, शिवराज अवलोळ, सोनाली शिंदे, अंजली पुजारे, दिलीप पेटकर, आकाश साखरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.