Akurdi News: वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब हांडे

एमपीसी न्यूज – वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेबमहाराज हांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आकुर्डी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 27 अ येथील संत तुकाराम उद्यान सभागृहात वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील यांनी ह.भ.प. भाऊसाहेब हांडे यांना निवडीचे पत्र सुपूर्द केले.

त्याचप्रमाणे कार्याध्यक्षपदी बांगर महाराज, उपाध्यक्षपदी पूर्णानंदमहाराज लोखंडे आणि परिषदेच्या राज्य युवाध्यक्षपदी अनंत गटकळ यांची नियुक्ती करण्यात आली.

वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राज्यात सुमारे साडेतीनशे शाखा असून आकुर्डी प्राधिकरणातील मेळाव्यात काही शाखांचे मोजके प्रतिनिधी आणि युवा कार्यकर्ते गगनगिरी पाटील यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ह.भ.प. विठ्ठलमहाराज पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रातील सर्व जातीपातींमधून आलेल्या संतांनी आपल्या साहित्यातून प्रबोधन करीत समाजाला मानवतेची शिकवण दिली. संतसाहित्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य वारकरी, धारकरी यांनी केले.

पुणे आणि पुणे जिल्ह्यातील परिसर ही ज्ञानोबा-तुकोबांप्रमाणेच जिजाऊ माँसाहेब अन् छत्रपती शिवाजीमहाराज यांची कर्मभूमी आहे. तसेच ज्ञानाचे माहेरघर अशीही पुण्याची सर्व जगामध्ये ख्याती आहे. अशा या भूमीत आताच्या काळात संतविचार रुजविण्याचे कार्य वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य ही संस्था विविध संमेलने आणि मेळाव्यांच्या माध्यमातून करते.

युवा पिढीचे जीवन सुसंस्कृत, निष्कलंक, निर्व्यसनी आणि सात्त्विक होण्यासाठी घरोघरी संतसाहित्य अन् संतविचार पोहोचले पाहिजेत म्हणूनच वारकरी साहित्य परिषद ही संस्था राज्यभर कार्यरत आहे!”

नवनिर्वाचित अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब हांडे यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करीत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. ह.भ.प. रामदासमहाराज कुटे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.