Charholi Budruk News : अनधिकृत उत्खनप्रकरणी बिल्डरला 25 लाखांचा दंड; अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलची कारवाई

बिल्डरकडून इमारत विकसित करताना शेजारील डोंगर फोडून अनधिकृत उत्खनन केले जात असल्याची तक्रार पुणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य धनंजय जाधव यांनी केली होती.

एमपीसीन्यूज :  गृहनिर्माण संकुलाच्या उभारणीसाठी अनधिकृत उत्खनन करणाऱ्या प्राईड वलर्ड सिटी या बिल्डर विरोधात अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्यावतीने दंडात्मक कारवाई करीत 25  लाखांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बेकायदेशीरपणे गौणखणीज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

चऱ्होली बुद्रुक येथील गट नंबर 132/4 मधील प्राईड वर्ल्ड सिटी बिल्डर या बिल्डरकडून मे. महावीर को. ऑप. हौसिंग सोसायटी या गृहनिर्माण संस्थचे गृह संकुलाच्या उभारणीचे काम सुरु होते.

या बिल्डरकडून इमारत विकसित करताना शेजारील डोंगर फोडून अनधिकृत उत्खनन केले जात असल्याची तक्रार पुणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य धनंजय जाधव यांनी केली होती.

या तक्रारीची दखल घेत चऱ्होली येथील तलाठी मारूती पवार यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्यावेळी  बिल्डरने राॅयल्टी भरली नसल्याचे  निर्दशनास आले. तसेच या प्रकरणी भोसरी मंडलाधिकारी यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार कारवाई केली.

घटनास्थळी 217.1275 ब्रास मुरूम व 217.1275 ब्रास दगड असा एकूण 434.255 ब्रासचा पंचनामा करण्यात आला.

तसेच या प्रकरणी संबंधित बिल्डरने सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने अप्पर पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या तहसीलदार गिता गायकवाड यांनी अनधिकृत उत्खननापोटी संबंधित बिल्डरला पंचवीस लाख रुपयांचा दंड ठोठावला.

दंडाची रक्कम तातडीने शासनाकडे जमा करण्याचा आदेशही गायकवाड यांनी दिला आहे.

दरम्यान, मागिल आर्थिक वर्षात तहसीलदार गायकवाड यांच्याकडून अप्पर पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये  आतापर्यंत 89 लाख 82 हजार 564 रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.