Akurdi News: इंधन दरवाढी विरोधात ‘माकप’ची निदर्शने

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज (गुरुवारी) आकुर्डी येथे निदर्शने करण्यात आली.

आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात झालेल्या आंदोलनात गणेश दराडे, अपर्णा दराडे, शेहनाज शेख, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, बाळासाहेब घस्ते, स्वप्नील जेवळे, संतोष गायकवाड, निर्मला येवले, मनीषा सपकाळे, सुषमा इंगोले, रंजिता लाटकर आदी सहभागी झाले होते.

केंद्र सरकारने महसूल गोळा करण्यासाठी पेट्रोल, डिझेलची दरवाढ करताना कायमस्वरूपी इंधन अधिभार लावला आहे. मागील वर्षांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता वर्षभरात सरकारने अतिरिक्त 35 रुपये दरवाढ केली आहे.

केंद्र सरकार 33 रुपये, राज्य सरकार 27 रुपये लिटरमागे कर वसूल करत आहे. घरगुती गॅसच्या किमती आवाक्या बाहेर गेल्या आहेत. वाहतुकीचा खर्च वाढून महागाई 18 टक्क्याने वाढली आहे. सामान्य जनता महागाईने होरपळत आहे.

कोरोनाच्या काळात सरकारे आणि तेल कंपन्या मालामाल झाल्या. मात्र, जनता बेहाल झाली आहे. सरकारने नव्या अर्थसंकल्पात रेशन कार्डधारक जनतेसाठी कोणताही दिलासा दिलेला नाही, असा आरोप आंदोलकांच्यावतीने करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.